नागपूर : आईवडिल कामावर गेल्यानंतर घरात एकट्या असलेल्या १५ वर्षीय मुलीवर एका पुजाऱ्यासह चौघांनी वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींनी अटक केली. पुजारी राजू ऊर्फ राजेश गबडे (५८), अशोक यादव (५६), मोईन (२५) आणि नजीर सैयद हुसैन (५८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पीडित १५ वर्षीय मुलगी गीता (बदललेले नाव)चे आईवडिल मोलमजुरी करतात. त्यांना मुलगी व दोन लहान मुले आहेत. पती-पत्नी दोघेही मजुरीसाठी सकाळीच घरातून निघून जातात. दोन्ही मुले शाळेत जातात. दुपारी गीता ही घरी एकटीच राहते. तिच्यावर आरोपी मोईन याची नजर पडली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्या मुलीच्या घरी दूध द्यायला येणारा दूध विक्रेता अशोक यादव यालाही ती मुलगी घरी एकटीच दिसायची. त्यामुळे त्यानेही घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा : प्रचारासाठी अल्प वेळ, उमेदवारांची होणार दमछाक !
अशोक यादव हा दर्शनासाठी गेला असता तेथील मित्र असलेला पुजारी राजू गबडे याला ही बाब सांगितली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुजारी राजू गबडे हासुद्धा त्या मुलीच्या घरी आला. पूजेचे साहित्य देण्याच्या बहाण्याने गबडे यानेही त्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर ही बाब कुलर-पंखा दुरुस्तीचे काम करणारा नजीर सैयद हुसैन यालाही माहिती पडली. त्यानेही घरी कुणी नसल्याची संधी साधून मुलीवर बलात्कार केला. अशाप्रकारे मुलीचा प्रियकर आणि पुजाऱ्यासह चौघांनीही वेळोवेळी मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे आणि प्रभारी दुय्यम निरीक्षक रेखा संकपाळ यांच्याकडे तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली. आरोपींनी मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. आरोपींना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हेही वाचा : अल्पसंख्याक व्याख्येचा पुनर्विचार करायला हवा; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे मत
अशी आली घटना उघडकीस
गीता ही गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात गेली होती. घरात ती फारशी कुणाशी बोलत नव्हती. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिची आई काळजीत पडली. त्यामुळे तिने शेजाऱ्यांकडे मुलीबाबत चौकशी केली. काही दिवसांपासून एका युवकासह काही लोकं वारंवार येत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आईने मुलीला विश्वास घेऊन विचारपूस केली. त्यानंतर चौघे जण काही दिवसांपासून लैंगिक शोषण करीत असल्याचे मुलीने सांगितले. त्यावरून १७ मार्चला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.