नागपूर : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर प्रियकराने तिला मित्राच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच प्रियकराच्या तीन मित्रांनी बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरासह चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन चारही आरोपींना अटक केली.
पीडित १७ वर्षांची मुलगी जरीपटक्यात राहते. तिच्या वस्तीत राहणाऱ्या एका युवकाशी तिची मैत्री झाली. काही दिवसांतच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या युवकाने तिला लग्न करण्याच्या आमिष दाखवले. त्यामुळे ती मुलगी त्या युवकासोबत फिरायला जात होती. ती मुलगी १५ वर्षांची असताना युवकाने तिला मित्राच्या घरी नेले. तेथे तीन मित्र पार्टी करीत होते. त्या मित्रांना घराच्या बाहेर बसवले आणि युवकाने घरात नेऊन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन तासांनंतर युवकाने मित्रांना प्रेयसीची ओळख करून दिली आणि दोघेही निघून गेले.
हेही वाचा : सत्कारमूर्ती म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्यास चोरी प्रकरणी अटक, कळंब तालुक्यातील शेतमाल चोरी प्रकरण
यानंतर तिचा प्रियकर काही महिन्यांसाठी कामाच्या शोधात गुजरातला गेला. प्रियकर गुजरातला गेल्यानंतर मुलीला प्रियकराच्या मित्रांनी गाठले. तिच्याशी मैत्री ठेवली. त्यानंतर तिघांनीही तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, तिने तिघांनाही नकार दिला. त्यामुळे तिनही मित्रांनी सांगितले की, ‘माझ्या घरी तुझ्यावर बलात्कार झाल्याची माहिती सर्वांना सांगेल. तसेच आईवडिलांनाही सांगून तुझी बदनामी करणार’ अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीने तिचा नाईलाज झाला. त्यानंतर तिनही युवकांनी तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच अनेकदा मुलीला फोन करून घरी बोलावण्यात येत होते. तिने घरी येण्यास नकार दिल्यास तिच्या घरी जाऊन तिला धमकावत होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्या मुलीवर चौघेही तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. यामुळे मुलगी तणावात राहायला लागली.
हेही वाचा : घाटकोपरच्या घटनेनंतर नागपुरातही अवैध होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर
तिच्या कुटुंबियांनी तिची आस्थेने चौकशी केली असता तिने चौघे जण वारंवार बलात्कार करीत असल्याची माहिती दिली. कुटुंबियांना धक्का बसला. तिला जरीपटका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जरीपटकाचे वरिष्ठ निरीक्षक दीपक भिताडे यांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीने आरोपीविरुद्ध तक्रार केली. आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून चौघांनाही पोलिसांनी अटक केली.