नागपूर : कुटुंबातील दोन मुलांना स्कूलव्हॅनने शाळेत नेणाऱ्या चालकाने मुलांच्या बहिणीचे अपहरण करून जंगलातील निर्जनस्थळी नेले. स्कूलव्हॅनमध्येच तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास भावंडांना जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. संदीप नंदलाल चौधरी (२१, बाबुलखेडा) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २० वर्षीय तरुणीला वडिल नसून आई मोलमजुरी करते. तिला लहान दोन भाऊ असून ते एका नामांकित शाळेत शिकतात. त्या मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी संदीप चौधरीची स्कूलव्हॅन लावण्यात आली होती. रोज भावंडाना घेण्यासाठी घरी येत असलेल्या संदीपची त्या तरूणीवर वाईट नजर होती. ती तरुणी कामाच्या शोधात असल्याची माहिती संदीपला होती. तो नेहमी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तिला जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करीत होता.
हेही वाचा : चंद्रपुरातील महाकाय दशमुखी दुर्गादेवी मूर्ती
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संदीप तरुणीच्या घरी आला. त्याने एका ठिकाणी नोकरी असून तेथे भेट देऊन येऊ, अशी बतावणी केली. त्यामुळे तरुणी त्याच्यासोबत केली. त्याने तरुणीला स्कूलव्हॅनमध्ये बसवले आणि थेट वाहन जंगलाच्या दिशेने वेगात नेले. बेलतरोडीच्या जंगलात नेऊन व्हॅन थांबवली. त्या तरुणीशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देत आरडाओरड केला. मात्र, जंगल असल्यामुळे कुणीही मदतीला आले नाही.
हेही वाचा : बिगुल वाजला! महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार ‘या’ जिल्ह्यात…
संदीपने त्या तरुणीला स्कूलव्हॅनमध्ये कोंबून तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास भावंडाच्या जीवाला धोका असल्याची धमकी दिली. रात्री नऊ वाजता तरुणीला त्याने घरासमोर सोडले आणि पळून गेला. तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दोघींनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून संदीपला अटक करण्यात आली.