नागपूर : शांती आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माकडे लोकांचा कल वाढत आहे. परिणामी दरवर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. यंदा केरळ व कर्नाटक राज्यातून तब्बल २५ हजार लोक नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहेत. यापैकी काही लोक नागपुरात पोहोचले असून उद्या मुख्य सोहळ्याला ३०० बस भरून लोक येत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका – वडेट्टीवार
दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. रविवारी पहिल्या दिवशी हजारावर लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यात राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यातील लोकांचा समावेश आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मविजय, भंते महानाग, भंते धम्मप्रकाश यांच्याकडून विविध राज्यातील अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जात आहे. याशिवाय जपानमधील २० उपासक आज श्रामणेर दीक्षा घेणार आहेत.