नागपूर : बालाजी आईस फॅक्टरीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले. जखमींना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात सर्वत्र अमोनिया वायू पसरल्याने श्वास घेणेही कठीण झाले होते. स्फोट इतका शक्तीशाली होता की, सिमेंटच्या भिंती तुटल्या. एका चारचाकी वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. थरार घटना उप्पलवाडी औद्यागिक परिसरात घडली. माहिती मिळताच सुगतनगर आणि कळमना अग्निशन केंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी पोहोचले.
अमोनियाचे दुष्परिणाम कमीत कमी होतील या दृष्टीकोणातून अग्निशमन जवानांनी परिसर रिकामा केला. जवळपास २०० मीटर अंतरापर्यंतचा परिसर मोकळा करण्यात आला. उप अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर रणदिवे, सुनील डोकरे, चालक स्वप्नील गावंडे, प्रशांत भक्ते, राजेंद्र सिंग, तुलसी वैद्य, विपीन नितनवरे, राठोड, जनबंधू याजवानांनी जीव धोक्यात घालून घटनास्थळी बचाव कार्य केले.
गड्डीगोदाम येथील रहिवासी अजय शाहू यांच्या मालकीची उप्पलवाडी येथे बालाजी आईस फॅक्टर आहे. थंडीचे दिवस असल्याने बर्फाची मागणी कमी असते. त्यामुळे कंपनीत कर्मचार्यांची संख्याही कमीच होती. घटनेच्या वेळी केवळ तीन कर्मचारी होते. अपघातात घुमानसिंग (५००), डुंगरसिंग (४५) दोन्ही रा. राजस्थान तर एक श्रावण बघेल (३८) असे तीन कर्मचारी जखमी झाले. दोघांना मेयो रूग्णालयात तर घुमानला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
एक हजार लिटर क्षमतेचे स्टोरेज
कंपनीत बर्फ तयार करण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेचे अमोनिया वायू स्टोरेज होते. या स्टोरजमधून समोरच्या तीन टँकमध्ये वायू पाठविला जातो. तांत्रिक कारणामुळे स्टोरेज आणि कॉम्प्रेसर फुटले. त्यामुळे आगीचा भडका उडाला. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, अमोनिया वायू हवेत पसरल्याने जवळपासचा परिसर रिकामा करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू होते.
हेही वाचा : स्वस्तात वाळू केव्हा मिळणार? अमरावती जिल्ह्यात केवळ एक वाळू डेपो
अमोनिया वायूचे दुष्परिणाम
अमोनिया वायुला अतिशय उग्र वास असतो. अमोनियाचा सर्वाधिक वापर रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी होतो. याशिवाय बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात कुलिंग सबस्टन्स म्हणूनही अमोनियाचा वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त प्रमाणात अमोनिया गेला तर तिचा मृत्यूदेखील होऊ शकतो. हवेत अमोनियाचे प्रमाण जास्त असल्याने नाक, घसा आणि श्वसनलिकेमध्ये तीव्र जळजळ होते आणि श्वास गुदमरतो, डोळ्यांतून पाणी गळून डोकेदुखीची समस्याही जाणवते.