नागपूर : सर्वत्र मातृदिन साजरा होत असतानाच एका मातेवर दु:खाचा डोंगर कोसळला. घरासमोर खेळणाऱ्या तिच्या तीन वर्षांच्या मुलाला एका भरधाव कारने चिरडले. गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा मातेच्या मांडीवरच जीव गेला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी संत्रा मार्केटजवळ चांदशहा दर्ग्यासमोर घडली. आदी ऊर्फ गांधी चनकू मालाकार असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
गच्छाली सजीत मालाकार (२८) ही मूळची चंद्रपूरची असून दोन महिन्यांपूर्वीच कामाच्या शोधात नागपुरात आली. ती मुलगा आदीसह संत्रामार्केटमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे होती. रविवारी सकाळी आदी घरासमोर खेळत होता. यादरम्यान, एका महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले व तिने आदीला चिरडले. त्याच्या आईने मुलाला मांडीवर घेतले आणि रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांना मदत मागत असतानाच मुलाचा जीव गेला. कारचालक महिला सुसाट निघून गेली. गणेशपेठ पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : चंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत एका अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू
मृतदेह शीतगृहात ठेवण्यास मेयोचा नकार
एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. महिला कारचालकाने अपघात होताच मागे वळून बघितले आणि कार भरधाव पळवली. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. मृत मुलाचे वडील कामाच्या शोधात ओडिशात गेले आहेत. त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती दिली असून ते परतीच्या प्रवासात आहेत. वडील नागपुरात पोहचण्यासाठी २४ तास लागणार असल्यामुळे मृतदेह शीतगृहात ठेवण्याची विनंती मेयो रुग्णालयातील अधिकाऱ्यांना नातेवाईकांनी केली होती. परंतु, मेयो रुग्णालयाने नकार दिल्याचा आरोप मृत मुलाचा मामा रोहित यांनी केला आहे.
हेही वाचा : ‘या’ चौदा गावातील नागरिकांनी केले दुसऱ्यांदा मतदान
जुलैत शाळेत जाणार होता आदी
पदपाथावरील मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लकडगंजमधील एका सामाजिक संस्थेने आदीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी आदीचे कागदपत्र तयार करून शाळेत घालण्याची तयारीही केली होती. येत्या जुलै महिन्यात आदी पूर्व प्राथमिक शाळेत जाणार होता. मात्र, शाळेचा पहिला दिवस उजाडण्यापूर्वीच आदीचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याची आई सैरभर झाली आहे.