नागपूर : उपराजधानीची ‘क्राईम सीटी’ अशी नव्याने ओळख निर्माण झाली आहे. शहरात गेल्या १० महिन्यांत सर्वाधिक हत्याकांड प्रेमप्रकरण, अनैतिक संबध, विवाहबाह्य संबंध आणि किरकोळ वादातून घडले आहेत. ६९ हत्याकांडांपैकी तब्बल ३४ खूनाच्या घटनांमध्ये अनैतिक संबंधाची किनार असल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर म्हणून नागपूरकडे बघितल्या जाते. मात्र, सध्या गृहमंत्र्यांच्याच शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. २०२२ वर्षाच्या तुलनेत या वर्षी गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी सक्रीय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत.
खून, बलात्कार, विनयभंग, घरफोड्या, चोऱ्या, दरोडा आणि घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी ६५ हत्याकांडाच्या घटना घडल्या होत्या आणि ११० वर आरोपींनी अटक करण्यात आली होती. मात्र, या वर्षी ऑक्टोबर महिन्यांतच शहरात ६९ हत्याकांड घडल्याची आकडेवारी समोर आली आहे. या हत्याकांडांपैकी प्रियकर-प्रेयसी, अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय आणि क्षुल्लक कारणावरून तब्बल ३४ हत्याकांड घडलेले आहेत. करोनानंतर कौटुंबिक वादाच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदी… भाजपच्या उत्तर प्रदेशच्या ‘या’ मंत्र्याचे वक्तव्य
पती-पत्नीतील वाद, प्रियकर-प्रेयसींमधील वाद, पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सासरचा त्रास, कौटुंबिक कलह आणि पत्नी किंवा पतीचे विवाहबाह्य संबंधातून वाद झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांत टोळीयुद्धातून किंवा गुन्हेगारांच्या कुरघोडीतून होणारी गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांमध्ये झालेल्या वर्चस्वाच्या वादातून २१ जणांच्या हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. तर जुन्या कारणावरून, पैशाच्या वादातून, संपत्तीच्या वादातून आणि दारू पिण्याच्या वादातून १९ खुनाच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : बुलढाणा : पिकांची अतोनात नासाडी, सव्वादोनशे जनावरे मृत अन् बारा घरांची पडझड; अवकाळीचा दुसऱ्या दिवशीही फटका
टोळ्या पुन्हा झाल्या सक्रीय
गेल्या पाच वर्षांपूर्वी शहरात पिस्तुलाचा वापर केवळ मोठमोठ्या गुन्हेगारांकडूनच होत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शहरातील जवळपास प्रत्येक गुन्हेगारांच्या टोळ्यांकडे पिस्तूल हमखास आढळून येते. मध्यप्रदेशात २५ ते ३५ हजार रुपयांत पिस्तूल मिळते. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये सुरु असलेल्या टोळीयुद्धात वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता प्रत्येक गुन्हेगारांच्या टोळीमध्ये पिस्तूलाचा वापर करण्यात येतो. पिस्तूल वापर करणाऱ्या गुन्हेगांवर नियंत्रण ठेवण्यात गुन्हे शाखेला सपशेल अपयश आले आहे.
महिलांवरील अत्याचारांमध्येही वाढ गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या दहा महिन्यांत २२६ तरुणी-महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत तर ४४५ महिलांचा विनयभंग झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. कौटुंबिक हिंसाचारात सासरच्या मंडळीने सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे २४४ गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंगाच्या गन्ह्यातही मोठी वाढ झाली आहे.