नागपूर : पावसामुळे उपराजधानीत हाहाकार माजला असतानाच चक्क सोनेगाव पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी शिरले. ठाणेदाराच्या कार्यालयासह अख्ख्या पोलीस ठाण्यात जवळपास चार ते पाच फुट पाणी साचले. त्यामुळे पोलीस ठाण्यातील सर्व कामकाज ठप्प पडले. एरव्ही सामान्य नागरिकांना मदतीसाठी धावून जाणाऱ्या पोलिसांनाच नागरिकांच्या मदतीची गरज पडली. ठाण्यात पाणी साचल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खुर्ची-टेबलवर उभे राहून पाणी ओसरण्याची वाट बघत होते.

हेही वाचा : Chandrapur Rain News: वर्धा, वैनगंगा, इरई नदीला पूर… विद्यार्थ्यासह दोघांचा वाहून गेल्याने मृत्यू…

उपराजधानीत शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु झाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता. पावसाच्या पाणी शहरातील अनेक वस्तीत घुसले. अनेकांच्या घरात पाणी घुसले. त्यामुळे धान्य, कपडे आणि अन्य वस्तूंचे नुकसान झाले. उड्डाणपुलाजवळ असलेल्या सोनेगाव पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. पावसामुळे आलेल्या पावसाचे पाणी पोलीस ठाण्यात घुसले. सोनेगाव पोलीस ठाण्याचा जवळपास चार तपे पाच एकर असलेल्या परीसर संपूर्ण जलमय होऊन गेला. पावसाच्या पाण्याचा वेग वाढताच तासाभरात सोनेगाव पोलीस ठाण्यात आणि सोनेगाव वाहतूक पोलीस कार्यालयात पाणी घुसले. सोनेगाव पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर कक्षात पाणी शिरल्यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज ठप्प पडले. तक्रारदारांना पोलीस ठाण्यात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापासून ते पोलीस कोठडीपर्यंत पाणी साचल्यामुळे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अचडणीत आले. पोलीस कर्मचाऱ्यांना कामकाज थांबविले आणि पावसाचे पाणी ठाण्याच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलीस ठाण्यात बसायलाही जागा नसल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खुर्चीवर उभे राहून किंवा चक्क टेबलवर बसून काम करीत असल्याचे चित्र होते. पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयापर्यंत पाणी घुसले. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यातून पाणी बाहेर काढण्यासाठी दुपारपर्यंत प्रयत्न केल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Video: रुग्ण बेडवर आणि बेडखाली तलाव…नागपुरातील शासकीय रुग्णालयात…

कशी मिळणार पोलिसांची मदत

पूर परिस्थिती किंवा आकस्मिक स्थितीत पोलिसांकडून सामान्य नागरिकांना मदतीची अपेक्षा असते. मात्र, सोनेगाव पोलीस ठाण्यात पाणी घुसल्यामुळे पोलिसांनाच नागरिकांच्या मदतीची गरज पडली. पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस वाहनेही पाण्यात अडकली तर कर्मचारीसुद्धा पोलीस ठाण्यात अडकून पडले. त्यामुळे जर एखाजी अनुचित घटना घडली असती तर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली असती.

पोलीस ठाण्याच्या बाजुला गेलेल्या नाल्यात कचरा अडकल्यामुळे पाणी साचले. ते पाणा जाण्यासाठी जागा नसल्यामुळे पाणी पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडमध्ये घुसले. पावासाचा जोर जास्त वाढल्यामुळे पावसाचे पाणी पोलीस ठाण्यात घुसले. सकाळी अकरा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात पाणी साचले होते. नाल्याचे पाणी ओसरल्यानंतर आता स्थिती नियंत्रणात आहे.

नितीन मगर ( ठाणेदार, सोनेगाव पोलीस स्टेशन)