शेतातील गुप्तधन काढण्यासाठी पाच तांत्रिकांद्वारे मध्यरात्रीच्या सुमारात पूजा सुरू असताना गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत त्यांना घेरले. लगेच पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकारामुळे सावंगी देवळी गावात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>>नागपूर : तर पुन्हा फडणवीसांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंगी देवळी परिसरात भोयर यांचे शेत आहे. त्या शेतात गुप्तधन असल्याची अफवा होती. त्यामुळे अनेक तांत्रिक त्यांच्या शेताची पाहणी करायला येत होते. त्यामुळे भोयर यांनी या प्रकाराकडे लक्ष ठेवले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनवणे यांच्यात शेतात काहीतरी विपरीत घडत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काही गावकरी तेथे पोहचले. शेतात पाच फूट खड्डा खोदून पाच जण पूजा करीत असल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत त्यांना विचारणा केली असता गुप्तधन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी लिंबू कापून त्याला कुंकू लावून फेकलेले होते. काही मांत्रिक मोठमोठ्याने मंत्रोच्चार करीत होते. त्यामुळे नागरिकांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा >>>नागपूर : चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बालकाला घरी नेले आणि….
पोलिसांनी तेथे छापा घालून पाच जणांना ताब्यात घेतले. शंकर सावरकर, विठ्ठल सोमनकर (सावळी), बाबा टेंभूळकर (टाकळघाट), वंदना गटकर (सावळी) यांचा समावेश आहे. त्यांचा सहकारी संदीप बहादूरे हा फरार झाला. हिंगणा पोलिसांनी हर्षल सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गावकऱ्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.