नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याचे जवळपास निश्चित केले आहे. केंद्रातील वजनदार मंत्री म्हणून ओळख असलेले गडकरी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे शहरातील तीनही प्रमुख नेते एकत्र आल्याचे चित्र असले तरी ग्रामीण राजकारण करणारे पण शहरातही काही प्रमाणात प्रभावशील असणारे माजी मंत्री सुनील केदार व त्यांचा गट भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीत ठाकरेंच्या सोबत असेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
नागपूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर काँग्रेसच्या प्रमुख स्थानिक नेत्यांच्या बैठकीत एकमत झाले. त्यासंदर्भातील प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्या नावाची केवळ घोषणा शिल्लक आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. सतीश चतुर्वेदी, आमदार अभिजित वंजारी आणि विकास ठाकरे तसेच इतर काँग्रेस नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितील झालेल्या या बैठकीत विकास ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले. परंतु या बैठकीला जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव असलेले माजी मंत्री सुनील केदार उपस्थित नव्हते. केदार यांनी नागपूर लोकसभेसाठी माजी नगरसेवक व वरिष्ठ नेते प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर केले आहे. गुडधे नागपूरसाठी सक्षम उमेदवार ठरू शकतील, असे केदार गटाचे मत आहे.
हेही वाचा : नितीन गडकरींची संपत्ती किती? जाणून घ्या फौजदारी प्रकरणे, कर्ज अन्…
पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार नागपूर आणि रामटके लोकसभा मतदाससंघातील उमेदवार, निवडणूक तयारी, प्रचार यंत्रणा यांची विभागणी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार, राऊत आणि चतुर्वेदी लक्ष घालतील. रामटेक लोकसभेची जबाबदारी सुनील केदार, राजेंद्र मुळक यांच्याकडे असेल. असे असले तरी केदार गटाकडून नागपूरसाठी गुडधे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. गुडधेही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज देखील केला आहे. त्यामुळे ठाकरेंना उमेदवारी मिळाल्यास केदार गटाकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
नागपूर शहर काँग्रेसमध्ये नेहमीच दुफळी राहिली आहे. त्यामुळे पक्ष कमकुुवत होत गेला. मात्र, यावेळी ठाकरे यांच्या नावावर स्थानिक नेत्यांनी एकमत घडवून आणले आहे. हे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम एकमेकांविरुद्ध राजकारण करीत आले आहेत. परंतु, सध्यातरी त्यांच्यात दिलजमाई झाली आहे. त्याचा फायदा गडकरी यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध लढताना काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. नागपूर लोकसभेत कुणबी जातीचे सर्वाधिक मतदार आहेत. काँग्रेसाठी ही जमेची बाजू असलीतरी अटीतटीच्या लढतीसाठी आवश्यक मतांची बेगमी होण्याकरिता केदार आणि गुडधे यांचेही सहकार्य लागणार आहे. पण, ठाकरेंच्या उमेदवारीवरून नाराज असलेले केदार व त्यांचा गट ठाकरे यांच्यासाठी लोकसभेत काम करेल का यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.