लोकसत्ता टीम
नागपूर: संपूर्ण देशात मातृदिन साजरा होत असताना नागपुरात एका मातेने पतीकडे राहणाऱ्या दोन्ही मुलांच्या विरहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सरिता सोहन कोहरे (२७, चंद्रमणीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता आणि सोहन हे अजनीत राहत होते. त्यांना दोन मुले आहे. सुखी संसार सुरु असताना पतीला दारुचे व्यसन जडले. त्यामुळे हातमजुरी करणारा सोहन हा दारु पिण्यात पैसे उडवित होता. घरातील आर्थिक परिस्थिती बघता सरिता हिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दारुपायी घरात पती-पत्नीत वाद वाढत गेले. पतीच्या मारहाणीला कंटाळून सरिताने पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने एका स्विट विक्री करणाऱ्या कंपनीत नोकरी स्विकारली. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून दोन्ही मुलांपासून ती विभक्त राहायला लागली.
हेही वाचा… धक्कादायक! तीन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील १०१ तरुणी व महिला बेपत्ता; राज्यात बारावा क्रमांक
दोन्ही मुलांच्या विरहात ती नेहमी राहत होती. मुलांच्या आठवणीमुळे ती नैराश्यात गेली. रविवारी मातृदिनाच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सरिता हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सरिता हिचा सहकारी आकाश तिला घ्यायला घरी आला असता त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून बघितले. त्याला सरिता ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याने शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.