नागपूर : चंद्रपूर येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीने पहिले लग्न लपवून एका दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून तिला गरोदर केले. महिलेला आरोपीच्या पहिल्या लग्नाबाबत माहिती मिळाल्यावर तिने गर्भपात करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय रुग्णालयाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचिकाकर्त्या महिलेच्या घरी २०१६ मध्ये आरोपी ‘सेट टॉप बॉक्स’ लावण्यासाठी आला होता. यादरम्यान आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक घेवून तिच्यासोबत संपर्क केला. काही काळानंतर महिलेने आरोपीसोबत संवाद बंद केला. २०१९ मध्ये आरोपीने तिच्यासोबत पुन्हा मोबाईलवर बोलणे सुरू केले. आरोपीने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. घरच्या मंडळींचा आंतरधर्मीय विवाहाला विरोध आहे, असे सांगत आरोपीने महिलेसोबत २३ जानेवारी २०२१ रोजी चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिरात लग्न केले. यानंतर याचिकाकर्त्या महिलेला ३ जानेवारी २०२२ रोजी पल्लवी नावाच्या महिलेने फोन करून सांगितले की ती आरोपीची पहिली पत्नी आहे. आरोपीला याबाबत महिलेने विचारणा केली असता त्याने सांगितले की, बारा वर्षापूर्वी पल्लवीसोबत त्याचे लग्न झाले होते. ती बाळाला जन्म देण्यास असमर्थ असल्यामुळे तो तिच्यासोबत घटस्फोट घेणार आहे. पहिली पत्नी पल्लवी घटस्फोट देण्यास तयार असल्याची बाब आरोपीने याचिकाकर्त्या महिलेला सांगितली.

हेही वाचा : घृणास्पद! जन्मदात्या वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महिलेने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ती चंद्रपूर येथे आरोपीसोबत राहू लागली. एप्रिल २०२२ मध्ये महिलेला ती गरोदर असल्याचे समजले. २ डिसेंबर २०२२ रोजी महिलेने बाळाला जन्म दिला. बाळाला घेवून महिला आरोपीच्या घरी आली. तिने आरोपीला पल्लवीसोबत घटस्फोटाबाबत विचारले असता आरोपीने महिलेला मारहाण केली. आरोपी सातत्याने महिलेला घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगायचा आणि नंतर याचिकाकर्ता महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये याचिकाकर्ता महिला पुन्हा गरोदर राहली पण तिने लगेच गर्भपात केला. याचिकार्ता महिला आता तिसऱ्यांदा गरोदर आहे. आरोपीने सातत्याने शारीरिक भूक भागविण्यासाठी वापर केला असल्याचा आरोप करत याचिकाकर्ता महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या महिलेच्या पोटात २२ आठवड्याचा गर्भ असून गर्भपातासाठी तिने न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने याप्रकरणी १७ मे शुक्रवारपर्यंत वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. महिलेच्यावतीने अ‍ॅड. एस. एच. भाटिया यांंनी बाजू मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur a person cheated on another woman as his wife was not having a baby tpd 96 css
Show comments