नागपूर : भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने नागपूरमध्ये पाषाणयुगीन कलाकृतींवर संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पाषाणयुगीन कलांवर संशोधन करणारे हे देशातील पहिलेच केंद्र आहे. प्रागैतिहासिक काळातील दगडावर कोरलेली चित्रे यांचा अभ्यास नागपूरच्या केंद्रात केला जाईल. मानवी सभ्यतेच्या इतिहासात पाषाणयुगीन चित्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. पाषाणयुगीन चित्र आणि कलांच्या माध्यमातून मानवी सभ्यतेची जडणघडण समजण्यात मदत झाली आहे. मात्र, पाषाणयुगीन कलांवर संशोधन करण्यासाठी भारतात स्वतंत्र केंद्र नव्हते. भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने आता नागपुरात केंद्र सुरू केले गेले आहे. मागील आठवड्यात केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, विरोधकांकडून नुसतीच बोंबाबोंब”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

हेही वाचा : नियमित कर्ज फेडूनही शेतकरी अनुदानापासून वंचित; राज्य सरकारची घोषणा हवेतच

भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक प्रा. किशोर बासा यांच्या संकल्पनेतून केंद्राची उभारणी करण्यात आली. पाषाणयुगीन कलांच्या अंतर्गत पिक्टोग्राफ (चित्र व रेखाचित्र), पेट्रोगिल्फ (कोरीव काम व शिलालेख), पेट्रोफॉर्म्स (आकृतीबंध दगड), जिओगिल्फ (जमिनीवरील चित्र) आदी प्रकार येतात. या सर्व प्रकारांवर नागपूरच्या संशोधन केंद्रात अभ्यास केला जाईल. एकाच छताखाली सर्व प्रकारचे संशोधन होणार असल्याने संशोधकांसाठी कार्य सुलभ होईल. ‘देशभरातून प्राप्त पाषाणयुगीन चित्रांचा लक्षपूर्वक संग्रह करण्यात येत आहे. यामधून तत्कालीन मानवी सभ्यता, त्यांच्या आहार-विहार, शिकाराची पद्धत आदी गोष्टींचा सखोल अभ्यास करणे सोपे होईल. भिमबेटकामधील सर्वात जुने चित्र ते सातपुडाच्या ग्वालीगढमधील भित्तीचित्र सर्वांचा अभ्यास केंद्रात करण्यात येणार आहे’, अशी माहिती पुरातत्त्व विभागातील नागपूर केंद्रातील रमेश मुलीमानी यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur a research center on stone age artifacts has been started by the archeology department of india tpd 96 css