नागपूर : उपराजधानीत महिला दिनी एका पुरुष रुग्णाने जगाचा निरोप घेताना केलेल्या अवयवदानातून एक महिला व एक पुरुष अशा दोघांना जीवदान मिळाले. सुभाष लुटे (६१) असे जगाचा निरोप घेताना अवयवदान केलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांच्या यकृतात तांत्रिक समस्या असल्याने त्याचे प्रत्यारोपण शक्य नव्हते. परंतु, एक मूत्रपिंड महिला, तर एक पुरुषाला देऊन दोन कुटुंबात प्रकाशाची पेरणी केली गेली.

हेही वाचा – पाचशे रुपये द्या, कॉपी करा; बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाची वसुली, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – निवृत्त अधिकारी पॉश हॉटेलात, विदर्भातील ‘आरटीओ’ची बाहेर रांग, नेमकी कशाची मोर्चेबांधणी?

अवयवदान करण्यासाठी सुभाष यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांनी संमती देऊन समाजाला आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे, हे नागपुरातील शंभरावे अवयवदान आहे. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या माहितीनुसार, ४ मार्च २०२३ रोजी व्यावसायिक असलेले सुभाष लुटे यांना मेंदूच्या विकारामुळे ओकाऱ्या सुरू झाल्या. त्यांना सेव्हन स्टार रुग्णायात दाखल करून उपचार सुरू झाले. उपचाराला प्रतिसाद नसल्याने विविध वैद्यकीय तपासणीनंतर ७ मार्चला डॉ. प्रशांत राहाटे, डॉ. उत्कर्षा घवघवे, डॉ रमेश हासमी, डॉ. मोहन नेरकर यांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. दरम्यान, पत्नी माया लुटे, तसेच मुलगा शुभम आणि रोशन यांना विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने अवयवदानाबाबत सांगितल्यावर त्यांनी अवयवदानासंदर्भात सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील दोघांना मूत्रपिंड उपलब्ध करून वेगवेगळ्या रुग्णालयात प्रत्यारोपित केले गेले.

Story img Loader