नागपूर : विद्यार्थी दशेत असलेल्या तरुणीला पुढील शिक्षण घ्यायचे होते. शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती. मात्र, कुटुंबियांना तिचे लग्न करून आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हायचे होते. त्यामुळे मुलीचे शिक्षण सुरु असताना तिचे लग्न करून दिले अन् तिने बघितलेल्या स्वप्नाचा चुराडा झाला.
लग्नानंतर नैराश्यात जावून तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ही घटना कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. प्रतीक्षा (१९) रा. भरतवाडा, असे मृतक तरुणीचे नाव आहे.
हेही वाचा – नागपूर : माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या, पोलीस ठाण्याला नागरिकांचा घेराव
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक्षा हिने तांत्रिक शिक्षण घेतले होते. पुढे उच्च शिक्षण घेऊन तिला नोकरी करायची होती. त्यामुळे तिने पुढील शिक्षणासाठी तयारी सुरु केली होती. शिकत असताना आयुष्याचे स्वप्न तिने रंगविले होते. याबाबत तिने कुटुंबीयांना सांगितलेसुद्धा होते. मात्र, आपल्या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी कुटुंबीयांनी तिचे लग्न करून दिले. लग्नानंतर ती नैराश्यात राहू लागली. ती नेहमी अबोल राहत होती. नेहमी शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न बघत होती. मात्र, सासरी कुटुंबियांची जबाबदारी आणि संसार सांभाळताना तिची घुसमट व्हायची. तिच्या डोक्यात शिक्षणाचे विचार सुरु असायचे. परंतु, लग्न झाल्यामुळे जबाबदारी बघता शिक्षण घेणे अशक्य वाटत होते. त्यामुळे तिने मंगळवारी पती व तिचे सासरे कामावर गेल्यानंतर गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.
हेही वाचा – धक्कादायक! सहा वर्षांत ९७८ शेतकरी, मजुरांना फवारणीतून विषबाधा; १५ जणांचा मृत्यू
पती पुरुषोत्तम (२६) घरी परतले तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी पोलिसांना सूचना केली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलविला. या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.