नागपूर: स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीची बैठक बुधवारी कस्तूरचंद पार्क जवळील परवाना भवनात झाली. यावेळी राज्यशासन व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करण्याचा अधिकृत निर्णय जाहीर करणार नाही, तोपर्यंत आंदोलन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. यासोबत ३० जूनपर्यंत होणा-या आंदोलनाचे टप्पे जाहीर करण्यात आले. समितीच्या बैठकीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांसह स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध असलेल्या संघटनांचे प्रतिनिधी व नेते उपस्थित होते.
मुंबईतील भाजपच्या बैठकीत घरघुती ३०० युनीट पेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक, लहान व्यवसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणार नसल्याचा दावा करण्यात आला होता.बैठकीत सर्वांनी या विषयावर चर्चा केली. याबाबत शासनाने अद्याप अधिकृत घोषणा केली नसल्याने हा निवडणुकीचा जुमला आहे, अशी शक्यता बैठकीत वर्तवण्यात आली. तसेच उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आणि यापूर्वी केलेल्या घोषणांमधील विरोधाभास कसा आहे. याकडे लक्ष वेधले. फडणवीस आता स्मार्ट मीटर लागणार नाही, असे म्हणत असले तरी या पूर्वी त्यांनी मीटर लावले जाणार अशी घोषणा केली होती, त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून फडणवीस आता हे मीटर लागणार नसल्याचे सांगत आहेत, निवडणुकीनंतर हे मीटर लावून भाजप आपला हेतू साध्य करेल,असा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे एकमताने राज्य शासन अध्यादेश काढून ही योजना रद्द केल्याचे वा ऊर्जामंत्री स्वत: ही योजना रद्द झाल्याचे जाहीर करावे, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, असे समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा : सेवानिवृत्तीचे वय वाढीचा विषय काय, विद्यार्थी संघटनांचा या निर्णयाला विरोध का? जाणून घ्या…
ही योजना सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर थोपवल्यास त्यावरील २७ हजार कोटींचा भुर्दंड वीज दरवाढीतून नागरिकांवर टाकला जाणार असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. बैठकीत ३० जूनपर्यंत विविध पद्धतीने होणा-या आंदोलनाचे विविध टप्पेही जाहीर करण्यात आले. त्यानंतर पून्हा समितीची बैठक घेऊन नवीन स्थितीनुसार पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा : शिक्षण अकरावी पास, व्यवसाय ‘डॉक्टरकी’…..मुदतबाह्य इंजेक्शन लावून….
आंदोलनाचे टप्पे
- २२ जून रोजी जगनाडे चौक येथे जनजागरण व जाहीर सभा.
- २३ जून रोजी मोमिनपुरा परिसरात जनजागरण व जाहीर सभा.
- २४ जून रोजी इंदोरा चौक येथे जनजागरण व जाहीर सभा.
- २५ जून रोजी काटोल रोड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन.
- २९ जून रोजी गणेशपेठ बस स्थानक येथे रस्ता रोको आंदोलन
- ३० जून रोजी नागरिक संघर्ष समितीतर्फे नागपूर जिल्ह्यातील आमदार – खासदारांना निवेदन देणार.