नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या सहा दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात उपोषण सुरू केले. सोमवारी आंदोलनाची सांगता झाली आणि यावेळी झालेल्या सभेनंतर विदर्भवाद्यांनी संविधान चौकात रस्त्यावर येऊन ठिय्या दिला. त्यामुळे नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुमारे ४० मिनिटे विस्कळीत झाली. माजी आमदार ॲड. वामन चटप यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ राज्याच्या मागणीसाठी २७ डिसेंबर २०२३ पासून उपषोण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सांगता सोमवारी सायंकाळी झाली. यावेळी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : “यात्रेला जनतेतून विरोध म्हणजे सरकारचे दिवस…”, संकल्प यात्रेबाबत वडेट्टीवार म्हणाले…
उपोषण आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली नाही . त्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. सभेदरम्यान वक्त्यांनी विदर्भावरील अन्यायाचा पाढा वाचला तसेच महाराष्ट्रात राहून विदर्भाचा मागासलेपण दूर होणार नाही, असे सांगितले. तसेच येथील आर्थिक, आरोग्य आणि नोकरी यातील अनुशेष कोणतेही सरकार आले तरी भरून काढू शकत नाही. विदर्भात वनसंपदा, खनिज संपत्ती, सुपिक जमीन आणि वीज निर्मितीमध्ये श्रीमंत आहे. पण, विदर्भात सिंचनाच्या सोयी नाही आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. विदर्भाचा विकास राज्यकर्ते करण्यास अपयशी ठरले आहे. यापुढे स्थिती बदल होणे शक्य नाही. विदर्भातील शेतकरी, युवक, उद्योजक, व्यापारी या सर्व घटकांच्या भले होण्यासाठी विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, असे ॲड. वामन चटप म्हणाले.
हेही वाचा : ट्रक चालकांच्या आंदोलनावर फडणवीस म्हणाले, “माहिती घेतो त्यानंतर…”
नेत्यांची भाषणे झाल्यावर आंदोलकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. त्यामुळे सुमारे ४० मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. या भागात वाहनांच्या मोठ्या रांगल्या होत्या. पोलिसांनी वामनराव चटप आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. उपोषण आंदोलनात अरुण केदार, प्रकाश पोहरे, रंजना मामुर्डे यांच्यासह १४ विदर्भवाद्यांचा समावेश होता.