नागपूर: नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात सर्व उमेदवारांकडून प्रचाराला गती दिली गेली आहे. भाजप- काँग्रेससह इतरही उमेदवारांच्या समर्थकांकडून दुचाकी रॅलीही काढली जात आहे. या रॅलीत अनेक दुचाकी चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी राजकीय कार्यकर्त्यांना हेल्मेटपासून सुट दिली काय? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांसह नागपूर मतदार संघातून एकूण २४ उमेदवार रिंगणात आहे. रामटेक मतदार संघातून काँग्रेसने श्याम बर्वे यांना तर शिवसेनेतर्फे (एकनाथ शिंदे गट) राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. येथे या दोघांसह एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे.
हेही वाचा : चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघातील मतदानाची १९ एप्रिल ही तारीख जवळ येत असल्याने सगळ्याच पक्षांसह अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांनी मतदारसंघातील सगळ्याच भागात प्रचाराला गती दिली आहे. हा प्रचार १७ एप्रिलला थांबणार आहे. प्रचारातील प्रमुख आयुधात दुचाकी रॅलीचाही सहभाग आहे. दरम्यान नागपूर शहरातील भाजप, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसह इतरही उमेदवारांच्या दुचाकी रॅलीत चालकाच्या डोक्यावर हेल्मेटच दिसत नसल्याचे खुद्द नागरिक सांगतात. हा प्रकार तेथे उपस्थित पोलिसांना दिसत असतांनाही ते कुणावरही कारवाई करत नाही. उलट काही वेळात येथून सामान्य नागरिक जात असल्यास त्याला पकडून दंड केला जातो. त्यामुळे रॅलीतील राजकीय नेत्यांना हेल्मेट सुट देण्यात आली काय? अशी असा प्रश्न खुद्द नागरिकांकडूनच उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
‘हेल्मेट’बाबत नियम..
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या,तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : “…तर सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती
हेल्मेट न घालणाऱ्यांना दंड किती?
मोटार वाहन कायद्यानुसार एखादा दुचाकी स्वाराने हेल्मेट घातला नसल्यास त्याला १ हजार रुपये दंड आकारला जातो. तसेच, त्या व्यक्तीचा वाहन चालवण्याचा परवानाही ३ महिन्यांपर्यंत निलंबित केला जाऊ शकतो.