नागपूर : उपराजधानीतील डेंग्यू नियंत्रणात येताना दिसत नाही. बघता- बघता शहरातील रुग्णसंख्या ७७६ रुग्णांवर पोहोचली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट असल्याचे चित्र आहे. भूखंड व इतरत्र पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डास उत्पत्ती झाली. त्यातून शहरात डेंग्यूचा प्रकोप सुरू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सतत हा आजार नियंत्रणात असल्याचा दावा होत असला तरी शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत. १ जानेवारी ते आजपर्यंत येथील डेंग्यूग्रस्तांची संख्या ७७६ रुग्णांवर पोहोचली आहे. शहरात आजपर्यंत वरील काळात ८ हजार ३०० संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे.
हेही वाचा : ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांचा १ नोव्हेंबरला मोर्चा; सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप
ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवसांत शहरात १ हजार १०० संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ७४ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे. आताही रुग्ण आढळत असल्याने डेंग्यूचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. परंतु आता डेंग्यू नियंत्रणात असून संशयितांचे नमुने तपासणीसाठी येणे कमी झाल्याचा दावा नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. नमुने नसल्याने शनिवारी प्रयोगशाळेत तपासणीच झाली नसल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले.