नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) १२ कोटी रुपयांचे ‘पेट स्कॅन’ हे यंत्र येथील महिला तंत्रज्ञ नोकरी सोडून गेल्याने धूळखात पडले आहे. कर्करुग्णांसाठी आवश्यक तपासणी बंद पडल्यावरही प्रशासन निद्रावस्थेत असल्याने ‘एम्स’च्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्र सरकारकडून नागपुरातील ‘एम्स’चा झटपट विकास होत असून येथे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचा दावा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात येथे उपचाराला येणाऱ्या कर्करुग्णांचे गेल्या दहा ते १५ दिवसांपासून प्रचंड हाल होत आहे. एम्समध्ये ‘न्यूक्लिअर फिजिसिस्ट’ विभागात डॉ. शंतनू पांडे हे विभाग प्रमुख म्हणून काम बघतात. परंतु, येथे कंत्राटी सेवा देणारी एक महिला तंत्रज्ञ नुकतीच नोकरी सोडून गेली.
सदर तंत्रज्ञाकडून एक महिन्यापूर्वी नोकरी सोडणार असल्याची अधिकृत नोटीस प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही प्रशासनाने या तंत्रज्ञाची सोय केली नसल्याने हे यंत्रच गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. दरम्यान, या यंत्रावर दैनिक ८ ते १० संशयित वा कर्करुग्णांचे पेट स्कॅन केले जात होते. या स्कॅनिंगसाठी आवश्यक रसायन रोज विमानाने नागपुरात येत होते. परंतु, एम्समधील ‘पेट स्कॅन’ बंद झाल्याने गरिबांची ही तपासणीच ठप्प पडली. नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील कर्करोग विभागातही हे यंत्र नसल्याने आता पैसे नसलेल्यांना ही तपासणी करता येत नाही.
हेही वाचा : सोयाबीनची उत्पादकता अधिक, नाफेडकडून खरेदी मात्र मर्यादित; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
एम्सचे तत्कालीन कार्यकारी संचालक हे मदूराईहून अधूनमधून नागपुरात येत होते. तर वित्तीय सल्लागार हे रायपूरहून येत होते. त्यामुळे या फाईल बरेच दिवस सहीसाठी ताटकळत राहत होत्या. या विषयावर एम्सचे तत्कालीन कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत राव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तर एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर ‘पेट स्कॅन’ बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.