नागपूर : शहरात तोतया पोलिसांची एवढी हिम्मत वाढली की थेट पोलीस ठाण्यासमोर उभे राहून नागरिकांना लुबाडत आहेत. अशीच घटना अजनी पोलीस ठाण्यासमोर घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तोतया पोलिसांनी कारमधून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला अडवले व सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. अजनी पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
नेमके काय घडले?
विजय केशवराव महाबुदे (६७, महावीर वॉर्ड, हिंगणघाट) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते शासकीय सेवेतून अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ७ जानेवारीला ते आयुर्वेदिक औषधी आणण्यासाठी पत्नीसह बजाजनगरला गेले होते. त्यानंतर पावणेबारा वाजताच्या सुमारास ते मानेवाडा येथे राहणाऱ्या नातेवाइकाकडे जायला निघाले. वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून अजनी पोलीस ठाण्याकडे जात असताना मोटारसायकलवरील दोन तरुणांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाबुदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अजनी पोलीस ठाण्यासमोर त्यांना आरोपींनी थांबविले व खिशातून पोलीस विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवत ते पोलीस असल्याची बतावणी केली. ‘आम्ही वारंवार तुम्हाला आवाज देत आहोत, थांबले का नाही?’ अशी विचारणादेखील केली. एकाच्या डोक्यावर टोपी होती तर दुसऱ्याने चेहऱ्यावर दुपट्टा बांधला होता.
हेही वाचा : शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
१.०५ लाखांचे दागिने लंपास
‘आजकाल लुबाडणूक वाढली आहे. तुम्ही दागिने घालून जाऊ नका’ असे त्यांनी महाबुदे यांना सांगितले व त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोनसाखळी काढायला सांगितले. महाबुदे यांनी अंगठी, सोनसाखळी व पत्नीच्या गळ्यातील हार खिशात काढून ठेवली. मात्र, आरोपींनी दागिने खिशात ठेवू नका, आम्ही कागदात बांधून देतो असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी एका कागदात दागिने बांधून दिले. त्याचवेळी आणखी दोन जण मोटारसायकलवर आले व त्यांनादेखील आरोपींनी थांबविले. त्यांनादेखील हातातील अंगठ्या काढायला लावल्या. त्यानंतर आरोपी निघून गेले. काही अंतरावर गेल्यावर महाबुदे यांना शंका आली. त्यांच्या सांगण्यावरून महाबुदे यांच्या पत्नीने कागद उघडला असता त्यात लहान दगड होते. आरोपींनी हातचलाखीने १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. महाबुदे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
अजनी पोलिसांचा वचक संपला
गेल्या काही दिवसांपासून अजनी पोलीस ठाण्याचा वादग्रस्त कारभार सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपी पळून गेला होता. त्या प्रकरणात अजनी पोलिसांची लपवाछपवी उघडकीस आली होती. त्यानंतर चक्क अजनी पोलीस ठाण्यासमोरच तोतया पोलीस उभे राहून लुबाडणूक करीत असल्याचे प्रकरण उघडकीस आले. अजनी परिसरात अनेक ठिकाणी अवैध दारुचे धंदे, वरली-मटका अड्डे आणि जुगाराचे अड्डे सुरु असून अजनी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.