नागपूर : जिल्हा निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मिशन डिस्टिंक्शन हाती घेतले होते. त्यासाठी विविध उपक्रमही राबवले होते तरी देखील मतदानाची टक्केवारी वाढली नाही. त्याउलट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले. नागपूर लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना खडेबोल सुनावणारे फलक धरमपेठ झळकले असून या फलकाची जोरदार चर्चा आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान कमी होण्यास जिल्हा प्रशासन मतदारांना आणि बीएलओ यांना जबाबदार मानत आहे. शहरातील काही नागरिकांनी तर मतदान करणाऱ्यांना जबाबदार धरले असून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यासंदर्भातील फलक धरमपेठ येथील ट्रॅफिक पार्क चौकात लावण्यात आले आहेत. या फलकावर मतदार म्हणून नाव नोंदवलेल्यांपैकी १० लाख १५ हजार ९३७ मतदान केलेले नाही असे लिहिले आहे. तसेच मतदान न करणाऱ्यांची लाज काढली आहे. हे फलक लावणाऱ्यांचे नाव प्रकाशित करण्यात आलेले नाही. त्याऐवजी मतदान करणाऱ्यांकडून हे प्रसिद्ध करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २३ हजार २८१ मतदार आहेत. त्यापैकी १२ लाख ७ हजार ३४४ मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख २८ हजार ६३६, महिला मतदार ५ लाख ७८ हजार ६८० आणि २८ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. नागपुरात यावर्षी ५४.३० टक्के मतदान झाले. याचाच अर्थ १० लाख १५ हजार ९३७ मतदारांनी हक्क बजावला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५४.९४ टक्के मतदान झाले होते.