नागपूर : उपराजधानीतील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत बांधकाम मजूरी करणाऱ्या चौघांनी सुट्टीच्या दिवशी पार्टीचा बेत रचला. खान्यासाठी चिकन व मासोळी आणली. हे पदार्थ शिजवण्याची तयारी सुरू असतांनाच तिघांचा चवथ्या मजूरासोबत वाद झाला. राग अनावर झाल्याने तिघांनी दगडाने ठेचून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी पसार आहे.

लम्बु उर्फ शिवम (३०) असे दगावलेल्या मजूराचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५) रा. गाव विटाल, तह. राजनांदगाव (छत्तीसगड), अखिलेश धोंडुलाल सहारे (२८) रा. अट्टाकोड, शिवनी, जि. बालाघाट, दिपक असे तिन्ही आरोपींचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत मिहान जवळ सुर्या रेसिडन्सीचे बांधकाम सुरू आहे. येथे मजुरांचा तुटवडा असल्याचे बघत ठेकेदाराने नागपूर रेल्वे स्थानकावरून या चौघांनाही कामासाठी साईटवर आणले.

हेही वाचा : अमरावती : ‘एसआरपीएफ’ भरती, मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार जखमी

चारही मजूरांकडे राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्यांना निर्माणाधीन इमारतीच्या जवळ टिनचे शेड असलेली खोली रहायला उपलब्ध केली गेली. दरम्यान, २० जूनला सुट्टीच्या दिवशी चारही आरोपींनी घरी पार्टी करण्याचा बेत रचला. त्यासाठी चिकन, मासोळीची भाजी करण्याचे निश्चित झाले. ही भाजीही आणली गेली. त्यानंतर तिघांनीही मद्यपान केले. त्यानंतर चिकन व मासोळी शिजवण्यावरून तिघांचा चवथ्या लम्बु उर्फ शिवम या मजूराशी वाद झाला. त्यात शिविगाळ सुरू होऊन संतापलेल्या तिन्ही आरोपींनी लम्बुच्या तोंडावर दगड मारला. लम्बु रक्ताच्या थारोड्यात पाडल्यावर तिघेही घाबरले. तातडीने तेथील उपस्थितांनी लम्बुला जवळच्या अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स)मध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान लम्बुचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदार बळीराम शिवराम मोगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी जितेंद्र रावटे आणि अखिलेश सहारे या दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली असून तिसरा दिपक नावाचा आरोपी पसार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा : गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची व्यथा! एकीकडे शिक्षणासाठी खंडणी तर दुसरीकडे…

आरोपींचा मुक्काम नागपूर रेल्वेस्थानकावर

सदर प्रकरणातील तीन आरोपी व चवथा दगावलेला व्यक्ती अशा चारही मजूरांचा मुक्काम नागपूर रेल्वेस्थानक परिसरात होता. चारही आरोपींना मद्यासह इतरही व्यसन होते. त्यामुळे कुटुंबियानी चौघांनाही घरातून हद्दपार केले होते. त्यातही चौघांचाही एक- मेकांशी परिचय नव्हता. हे चारही व्यक्ती मिळेत ते काम करून मिळालेल्या मजुरीतून मद्यपान करत होते. त्यामुळे चारही मजूरांना ठेकेदार कामासाठी मिहान जवळील निर्माणाधीन इमारतीच्या साईटवर घेऊन आला होता.