नागपूर : जुलै महिन्यापासून आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नाही. या वेतनाच्या मागणीसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी आशा व गटप्रवर्तक युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हाच्या बॅरनखाली लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी संविधान चौकात रात्री काळी दिवाळी साजरी केली. उपराजधानीतील तापमान रात्री कमी होत असतानाही मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनापूर्वी आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या रांगोळ्या काढत दिवे लावून सरकारच्या चुकीच्या भूमिकेचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मराठा समाजाबाबत तत्परता; ओबीसींचा सांख्यिकी तपशील गोळा करण्याबाबत सरकारची उदासीनता

यावेळी राजेंद्र साठे म्हणाले, गेल्यावर्षीही दिवाळीत आशा वर्करच्या खात्यात मानधन आले नव्हते. यंदाही स्थिती सारखी आहे. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी दिवाळी कशी साजरी करायची, हा प्रश्नच आहे. सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवारी रात्री लक्ष्मी पूजनाच्या एक दिवसापूर्वी संविधान चौकात काळी दिवाळी साजरी करत आहोत. आताही तातडीने सरकारने या कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन जमा न केल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही साठे यांनी दिला.

हेही वाचा : आमदार रोहित पवार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील भगिनींसोबत साजरी करणार भाऊबीज

आशा वर्करच्या खात्यात १ तारखेलाच मानधन जमा करण्याची मागणीही यावेळी केली गेली. आंदोलनात प्रामुख्याने प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, लक्ष्मी टेजवार, माया कावळे, कोमेश्वरी गणवीर, आरती चांभारे, कांचन बोरकर, रुपलता बोंबले, प्रतिमा डोंगरे यांच्यासह शेकडो आशा वर्कर सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur asha workers celebrated black diwali due to non payment of salary mnb 82 css