नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्ट आणि परखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांच्या भाषणांचे अनेक लोक चाहते आहेत. स्वत: पक्ष आणि पदाधिकाऱ्यांनाही ते भर सभेत आरसा दाखवायला मागे पुढे बघत नाही. यामुळे अनेकदा त्यांची अडचणही वाढते. गडकरींची ओजस्वी वाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. परंतु, एकेकाळी गडकरींना भाषणही देता येत नव्हते. इतरांना भाषण देताना पाहून ते हतबल होत होते. यात महत्त्वाची बाब म्हणजे नितीन गडकरींनी त्यांच्या वर्गमित्रांसोबत एका मैत्रिणीची गंमतही केली.
तिचे भाषण सुरू असताना गडकरी आणि त्यांच्या मित्रांची खोडकरपणा केला. परंतु, शाळेतील शिक्षकांनी यासाठी त्यांना रागावले आणि नंतर असे काही घडले की गडकरी एक ओजस्वी वक्ता झाले. नागपूरमध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी ते वक्ते कसे बनले याचा किस्सा सांगितला.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मंडळींसोबत संवाद साधला. शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला.
गडकरी म्हणाले, मी शाळेत असताना वर्गमैत्रिण भाषण देत होती. बोलता बोलता ती काहीशी अडखळली. त्यावर आम्ही मुलांनी तिची टींगल केली. पाणी घे… पाणी घे… असे म्हणून तिला चिडवले. हे बघुन वर्गशिक्षकांनी आम्हाला नंतर बोलावून घेतले आणि चांगलाच मारही दिला. पुढे जाऊन बोलायला हिंमत हवी असते. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वत: भाषण द्या, असे आवाहन केले. गडकरींनी हे आवाहन स्वीकारले. पुढे भाषण द्यायला लागलो. विद्यापीठामध्ये भाषणासाठी सुवर्ण पदकही मिळाले, असा किस्सा गडकरींनी सांगितला.
पुढे गडकरी म्हणाले, आपण जो विद्यार्थी घडवतोय तो भविष्यात कसा नागरिक बनेल, याचे उत्तर आज देणे शक्य नाही. कारण परिपूर्णतेची खात्री कुणीही देऊ शकत नाही. पण, प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील गुण ओळखता येतील का, त्या गुणांना विकसित करता येईल का आणि त्याच गुणांच्या आधारावर भविष्यात रोजगार मिळवता येईल का, याचा विचार करावा लागेल, असेही गडकरी म्हणाले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सामान्य घरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.
© The Indian Express (P) Ltd