नागपूर : देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प कोणता, तर तो म्हणजे महाराष्ट्रातील बोर व्याघ्रप्रकल्प. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाइतके व्याघ्रवैभव येथे नाही, पण इथल्या वाघांनीही पर्यटकांना वेड लावले एवढे मात्र खरे. ‘कॅटरिना’ म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्पाचे वैभव. बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी अशी तिची ओळख. नुकतेच ती बछड्यांसह पर्यटकांसमोर आली आणि तिने ‘गुड न्यूज’ दिली. रविवारी पर्यटक बोर व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी आले. पर्यटकांची जिप्सी बोर व्याघ्र प्रकल्पातील चारगाव टिप्पत, गव्हाणखेडी परिसरात असताना अचानक वाघाची डरकाळी पर्यटकांच्या कानावर पडली. त्यानंतर जिप्सी चालकानेही सावध पवित्रा घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्याच सफारीत सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ती पर्यटकांसमोर आली आणि तिच्या दर्शनाने पर्यटक सुखावले. मात्र, अवघ्या काही सेकंदात तिच्यापाठोपाठ एक दीड महिन्याचा बछडा बाहेर आला आणि ‘कॅटरिना’ आई झाल्याचे बघून त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. ‘कॅटरिना’चे अधिकृत नाव ‘बीटीआर-३’ असे आहे. अतिशय रुबाबदार आणि गोंडस असा तिचा बछडा आहे. यापूर्वीही तिने चारवेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला आहे. तर आता पाचव्यांदा ही वाघीण आई झाली आहे. यापूर्वीच्या तिच्या बछड्यांमध्ये ‘युवराज’ (बीटीआर-४), ‘पिंकी’ (बीटीआर-७) हे तिच्याइतकेच प्रसिद्ध झाले आहेत.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला का येत आहेत? जाणून घ्या रहस्य…

रविवारी पर्यटकांना तिच्यासोबत दिसलेला बछडा आतापर्यंतच्या तिच्या बछड्यांपैकी सर्वाधिक रुबाबदार असल्याचे पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प अशी बोर व्याघ्रप्रकल्पाची ओळख आहे. ऑगस्ट २०१४ साली त्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. दरम्यान, ‘कॅटरिना’ची आई होण्याची वार्ता दूरवर पसरली आणि पर्यटकांची पावले त्यांना पाहण्यासाठी इकडे वळू लागली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur at bor tiger reserve katrina tigress became mother for fifth time rgc 76 css