नागपूर : एसटी बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार आहे, अशी माहिती देणारे एक पत्र मिळाल्याने बसस्थानकावर एकच खळबळ उडाली. या पत्रामुळे प्रवाशांसह एसटी प्रशासनाची तारांबळ उडाली. काही वेळातच बस रिकामी करण्यात आली. एसटी प्रशासनाने गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथकाकडून बसची कसून तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. हा प्रकार सोमवारी गणेशपेठच्या मुख्य बसस्थानकावर घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी दुपारच्या सुमारास एमएच-३१-एन-८५०१ या क्रमांकाची बस गोंदियाहून नागपूर बस स्थानकावर आली. ही बस आमगाव, देवरी मार्गाने नागपुरात पोहोचली. बस गणेशपेठ मुख्य बसस्थानकावर थांबली होती आणि काही वेळानंतर पुन्हा गोंदियासाठी निघणार होती. त्यामुळे प्रवासी बसमध्ये बसले. दरम्यान गोंदियाला जाणाऱ्या एका प्रवाशाला एका सीटखाली एक कागद मिळाला. त्यातील मजकूर वाचला असता त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्या पत्रात ’बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे,’ असे नमूद होते. पत्र त्याने चालकाला दिले. चालकाने क्षणाचाही विलंब न करता प्रवाशांना खाली उतरविले आणि प्रवासी नाहीत अशा ठिकाणी बसला उभी केली.

हेही वाचा : रेल्वेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा

मिळालेले पत्र चालकाने नियंत्रकाला दिले. कंट्रोलरने लगेच गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सोबतच बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथकाकडून बसची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, बसमध्ये घातपात करणारी वस्तू आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पथकाने बस स्थानक परिसरही पिंजून काढला. सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त होता. कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान प्रवाशांना दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले. काही महिण्यापूर्वीच गणेशपेठ स्थानकावरील एका बसमध्ये मिळालेल्या अग्निशमन यंत्रालाच बॉम्ब असे समजून खळबळ उडाली होती, त्यावेळीसुद्धा यंत्रणा खळबळून जागी झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur at ganeshpeth bus stand letter about bomb in st bus found adk 83 css
Show comments