नागपूर : सामायिक ऑटो रिक्षाद्वारा स्वस्त फीडर सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोने पुढाकार घेतला असून सुरुवातीला ३७ मेट्रो स्थानकांवरून ही सेवा सुरू होणार आहे. महामेट्रोने प्रत्येक स्थानकांलगतच्या परिसराचे तपशीलवार सर्वेक्षण करून स्थानकापासून किती अंतरावर वस्त्या आहे याचा अभ्यास करून सविस्तर माहितीसह प्रस्ताव आरटीओकडे पाठवला. ऑटोरिक्षाचे समान भाडे ठरवण्याची विनंती आरटीओला केली आहे.
हेही वाचा : चंद्रपूर-नागपूर मुख्य महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस विभागाचे दुर्लक्ष
या संदर्भात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच बैठक घेतली. त्याला आरटीओ रामभाऊ गीते, पोलीस उपायुक्त ( वाहतूक) चेतना तिडके आणि महापालिका परिवहन व्यवस्थापक उपस्थित होते. आरटीओ कार्यालयाने मेट्रोचा प्रस्ताव पोलिसांकडे पाठवला असून त्यांनी मंजूर केल्यावर मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाईल. ऑटो रिक्षाने एकट्याने प्रवास केल्यास संपूर्ण रक्कम भरावी लागेल. जर एकच ऑटो रिक्षा २-३ लोकांनी शेअर केला असेल तर प्रत्येकाला समान प्रमाणात पैसे द्यावे लागतील. यामुळे मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढू शकते.