नागपूर : रामटेकमध्ये एका दलित आणि मुस्लीम युवकाला मारहाण करण्यात आली. त्यात दलित युवकाचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे दलित असताना येथे का आला, अशी विचारणा मारेकऱ्यांनी केली. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी घडलेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव विवेक विश्वनाथ खोब्रागडे (२१, सीतापूर, देवलापार. ता. रामटेक) आहे तर तर फैजान खान (पवनी) असे जखमी युवकाचे नाव आहे. या घटनेचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी घटनेचे सत्य समोर आणण्याचे आवाहन गृहमंत्र्यांना केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री नागपूर जिल्ह्याचे आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून यातील सत्य जनतेपुढे आणावे. या घटनेसंदर्भात पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात जे कारण नमूद आहे ते खरे असले तर जे दोषी असतील, त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे. ज्या महाराष्ट्राला सामाजिक इतिहास आणि उज्ज्वल परंपरा लाभली आहे, त्या राज्यात अशी घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रामाने असा कधी जातिभेद केला नाही, त्या रामटेकमध्ये असा प्रकार व्हावा. यावर सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. निषेध करायला देखील शब्द नाही, अशी ही घटना आहे, अशी प्रतिक्रिया गांधी यांनी दिली.

हेही वाचा : “पीक नुकसानीवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी; म्हणाले, “हिवाळी अधिवेशनात…”

या घटनेत ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कडक करवाई केली पाहिजे. तेथे तैनात आणि घटनेत सहभागी असलेल्या होमगार्डला तात्काळ कामावरून काढून टाकावे. पोलिसांनी या निंदनीय प्रकारास गांभीर्याने घ्यावे आणि तातडीने कारवाई करावी. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ही घृणास्पद घटना आहे. अस्पृशांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन केले होते. तुम्ही किती दिवस आम्हाला अस्पृश्य समजाल. एखाद्या व्यक्तीला मरेपर्यंत मारणे हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. आपण कोणत्या शतकात चाललो आणि देशाला कुठे घेऊन चाललो आहे. हे त्यातून दिसत आहे. या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

हेही वाचा : त्रुटीची पूर्तता, तरीही जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेना; शिवसेना आक्रमक होताच समितीचे अध्यक्ष म्हणतात…

याला रामराज्य म्हणायचे का – वडेट्टीवार

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा घटना निंदनीय आहे. यापूर्वी देखील या सरकारच्या काळात दलित आणि मुस्लिमांवर अनेक अत्याचार झाले. रविवारची घटना त्यावरील कळस आहे. प्रभूरामचंद्राच्या रामटेकमध्ये शोभायात्रेत सहभागी होऊन परतणाऱ्या एका दलित युवकाला जर जीव गमवावा लागत असेल. तर याला रामराज्य म्हणायचे का हा प्रश्न आहे. वास्तविक ही प्रवृती गेल्या नऊ वर्षांत वाढली आहे. जाती-धर्मात विष पेरण्याचे काम गेल्या नऊ वर्षांत झाले. धर्मांध शक्तीला शक्तीला ठेचावे लागेल. राज्यावरचा पुरोगामीत्वाचा ठसा मिटवू पाहणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. आम्हाला प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आणि आरोपीस पाठीशी घालणारी वाटत आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur at ramtek death of dalit youth and muslim youth beaten up vijay wadettiwar statement on the incident rbt 74 css