नागपूर : कॅट वॉक, रॅम्प वॉक यावर तरुणींचीच मक्तेदारी नाही तर, त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने आम्ही ते करु शकतो. एवढेच नाही तर पाहणाऱ्याला जागीच खिळवून ठेवण्याचे कसब आमच्याइतके कुणाकडे नाही. जगभरातील पर्यटक, सेलिब्रिटी यांना भूरळ घालणाऱ्या भारतातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोलारा गाभा क्षेत्रात ‘रोमा’ ही वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या या ‘रोड शो’ने पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी हा ‘रोड शो’ त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. प्रत्यक्षात तो अनुभवू न शकणाऱ्या इतर पर्यटकांसाठी त्यांनी तो उपलब्ध करुन दिला. विशेष म्हणजे अलीकडेच प्रकाशित झालेल्या लोकसत्ताच्या ‘वाघ’ या कॉफी टेबल बुकमध्येही त्यांनी टिपलेली वाघाची अप्रतिम छायाचित्रे आहेत. पावसाळ्यानंतर पर्यटनाचा हंगाम नुकताच सुरू झाला आणि ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी पर्यटकांना खूश करण्याचा जणू विडाच उचलला. ‘रोमा’ ही प्रसिद्ध वाघीण ‘छोटी तारा’ची मुलगी आणि ‘बिजली’ची बहीण आहे. ‘रोमा’ ही अतिशय धाडसी वाघीण आहे, जी कोणालाही घाबरत नाही.
हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आश्वासन दिले नसते तर…” विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
धाडसी ‘छोटी तारा’ची मुलगी असल्याने तिला जंगलात जिप्सींच्या हालचालींची सवय आहे. ‘रोमा’ ही ‘छोटी तारा’ची प्रतिकृती आहे. आईने शिकवलेली प्रत्येक गोष्ट तिच्यात दिसून येते. कुणबी टाकी आणि वसंत बंधारा (ताडोबाचे गाभा क्षेत्र) जवळचा परिसर म्हणजे तिचा अधिवास. जानेवारी महिन्यात देखील ‘रोमा’ तिचे बछडे अगदीच लहान असताना त्यांच्यासोबत ताडोबाच्या रस्त्यावर ‘रोड शो’ करताना आढळून आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तीने बछड्यांसह कोलारा गाभा क्षेत्रात ‘रोड शो’ केला आणि पर्यटकांना जणू मेजवाणी दिली