नागपूर : नागपूरच्या तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला असून या तळपत्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर बाहेर कठीण झाले आहे. दुपारच्या वेळेला नागपूरकरांना प्रचंड उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिर प्रशासनाने भाविकांना या उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळावा यासाठी मंदिर परिसरात स्प्रिंकलरची सुविधा केली असून भाविकांना थंडावा मिळत आहे.
मंदिर परिसरात हिरवा पडदा लावण्यात आला असून स्प्रिंकलरमधून सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. त्यामुळे थंड पाण्याचा फवारा भाविकांच्या शरीरावर पडतो आणि त्यांना थंडपणा जाणवतो. या स्प्रिंकलरमुळे मंदिर परिसरदेखील थंड राहतो, बाहेरील तापमानापेक्षा मंदिर परिसरात ४ ते ५ अंशाचा फरक लोकांना जाणवतो.
हेही वाचा : निवडणूक संपताच आमदार निघाले समुद्रकिनारी….पण, तेथेही निवडणुकीचेच…..
या स्प्रिकलरच्या माध्यमातून निघणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांनी परिसरातील वातावरण थंड होत असल्याने गणेश भक्तांना दर्शनाआधीच प्रसन्न वातावरणाची अनुभूती येत आहे. या संदर्भात मंदिराचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी सांगितले, की मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्यावर्षी आम्ही ही व्यवस्था केली होती. त्यामुळे यावेळी भाविकाकडून मागणी करण्यात आल्यामुळे ही व्यवस्था केली आहे. या ठिकाणी आठ स्प्रिकलर लावले आहे. गणेशमूर्तीच्या शेजारी कुलर आणि वातानुकुलित लावण्यात आले आहे.