नागपूर: अमरावतीत २२ एप्रिल रोजी प्रा. अंबादास व ज्योती मोहिते यांचे चिरंजीव विराज आणि नितीन व सरिता गोमेकर यांची सुकन्या सलोनी यांचा विवाह आगळ्या- वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विविध प्राणी, पक्षी, डोंगर, पर्वतरांगा, नद्या अशा विविधतेने नटलेल्या आपल्या सुंदर धरतीमातेसाठी २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
पृथ्वीवरील वाढते प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा वसुंधरा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू असल्यामुळे याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘करा औषधी वनस्पतींचे संवर्धन – होईल समृद्ध पर्यावरण” हे घोषवाक्य घेऊन विवाह सोहळ्यात भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. सुनील शुक्रे, म्हाडाचे माजी मुख्यधिकारी अरुण डोंगरे, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महानगर पालिका आयुक्त देविदास पवार, उदय भास्कर नायर, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार किरण सरनाईक, आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके आदी मान्यवरांना नव वधूवरांच्या हस्ते औषधी वनस्पतींची रोपटे कुंडीसह देऊन वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.
हेही वाचा : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन महिला गंभीर
विवाह सोहळ्यात १००० निमंत्रित अतिथींना सुद्धा खंडू चक्का, कृष्ण फळ (पॅशन फ्रूट), इन्सुलिन वनस्पती, रक्त चंदन, तुती (मलबेरी), अडुळसा, लक्ष्मण फळ, अंतमुल (डम वेल), तुळस, शेवगा, पुदिना आदी औषधी वनस्पतींची रोपटे देऊन वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी प्रा मोहितेंचा मोठा मुलगा तुषार मोहिते याच्या विवाहा प्रित्यर्थ ५ जून ला संपन्न झालेल्या स्वागत सोहळ्यात सुध्दा पर्यावरण दिना निमित्त १००० फुल झाडांचे वाटप करून निमंत्रीतांचे स्वागत करण्यात आले होते, विविध औषधी वनस्पतींचे जतन केल्यास त्याचा उपयोग आपल्या स्वास्थ्यासाठी तर होईलच पण त्या सोबतच पर्यावरण समृद्ध होण्यास देखील मदत होणार असल्यामुळे जनतेने औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी असे आवाहन प्रा अंबादास मोहिते यांनी याप्रसंगी केले.