नागपूर : बहेलिया शिकाऱ्यांनी वाघांच्या शिकारीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या संख्येने वाघ मारले गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चौकशीतून दररोज वेगवेगळी माहिती समोर येत असल्याने महाराष्ट्र वनखात्याचे अधिकारीही हादरले आहेत. शनिवारपर्यंत झालेल्या चौकशीत बहेलियांकडून वाघांची शिकार आणि अवयव विक्रीत तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिकचा व्यवहार आणि तीन वाघांच्या शिकारीची माहिती समोर आली आहे.
अजित राजगोंड उर्फ अजित पारधी व त्याच्या कुटुंबीयांना २५ डिसेंबरला राजूरा येथून अटक करण्यात आली. त्याचवेळी वाघांच्या शिकारीचे मोठे रॅकेट उघडकीस येईल हे स्पष्ट दिसत होते. पहिल्या दिवशी २० लाख रुपये, त्यानंतर ७० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार या शिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीद्वारे झाल्याचे समोर आले. त्यानंतर आसाम रेजिमेंटमधून २०१५ साली सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाला शुक्रवारी शिलाँग येथून अटक करण्यात आली. या अटकेनंतर वाघांच्या शिकार प्रकरणात बहेलियांकडून तब्बल दोन कोटी रुपयाहून अधिकचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वाघाची कातडी, हाडे यासाठी सुमारे २२ ते २५ कोटी रुपये घेतले जातात. त्यामुळे या प्रकरणात दहापेक्षा अधिक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता कुणीही बोलण्यास तयार नव्हते.
स्वतंत्र विशेष तपास पथक
या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना आणि देशातील सर्व महत्त्वाच्या वाघांच्या वस्ती असलेल्या क्षेत्रांशी संबंधित अधिकाऱ्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली येथील विशेष कार्य दलाचे सदस्य, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र वन विभागाचे सदस्य असलेले एक स्वतंत्र विशेष तपास पथक देखील स्थापन केले आहे, जे राष्ट्रीय स्तरावर तपासात अधिक मदत आणि समन्वय साधेल.
वाघाच्या मृतदेहाचे अवशेष, शिकारीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त
या प्रकरणात विशेष तपास पथकाने पाच विशेष शोध पथके स्थापन केली. या पथकांमध्ये चंद्रपूर पोलिस आणि गोंदिया वनविभागाचे प्रगत मेटल डिटेक्टर आणि दोन स्वतंत्र श्वान पथके होती. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राच्या उपसंचालक पीयूषा जगताप यांच्या समन्वयाने शोध पथके गेल्या काही महिन्यांत आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर आधारित मोक्याच्या मार्गांवर पायी गस्त घालत आहेत. शनिवारी राजूरा तालुक्यातील नलफडीच्या जंगलातून या बहेलिया शिकाऱ्यांनी वाघ मारल्याचे समोर आले. यात वाघाच्या मृतदेहाचे अवशेष, शिकारीसाठी वापरलेली शस्त्रे आणि संभाव्य शिकारींच्या घालण्यायोग्य वस्तू आढळल्या. हे सर्व सीसीएमबी हैदराबाद येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले.