नागपूर : बँकेत ठेवण्यात आलेल्या सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने ग्राहकांशी हातमिळवणी करुन बनावट दागिणे बँकेत ठेवले. त्या बनावट दागिण्यांवर कर्ज मिळवून बँकेचा विश्वासघात करीत ७३ लाख ९० हजार रुपयांनी बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनिल उरकुडे (५९) रा. लालगंज असे आरोपीचे नाव आहे. सोने तपासणाऱ्याने वापरलेल्या शक्कलेमुळे बँकेतील अनेक जण अचंबित झाले आहेत.
पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत कमाल चौक येथे शिक्षक सहकारी बँक आहे. लक्ष्मण सगम (५७) यांच्याकडे व्यवस्थापकाची जबाबदारी आहे. अनिल उरकुडे हा सुवर्णकार असून त्याला दागिणे तपासणीसाठी नियुक्त केले. बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्याचे दागिने खरे आहेत किंवा नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी अनिलची होती.
त्याच्या प्रमाणपत्रावरूनच सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांना कर्ज मंजूर करण्यात येत होते. हीच संधी साधून अनिलने शक्कल लढविली. २४ मार्च २०१७ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत म्हणजे १६ महिण्यांत त्याने १६ ग्राहकांशी हातमिळवणी केली. विशेष म्हणजे सर्व ग्राहक त्यानेच तयार केले. बनावट दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांना कर्ज मिळण्यासाठी त्याने मार्ग उपलब्ध करून दिला. म्हणजे बनावट दागिने असल्यानंतरही त्याने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेला दिले. त्यामुळे बँकेने त्या सर्व ग्राहकांना कर्ज दिले.
सुरूवातीचे काही हप्ते ग्राहकांनी भरले. मात्र, नंतर बँकेचे हप्ते थकले. बरेच दिवस होऊनही ग्राहक हप्ते भरत नसल्याने बँक व्यवस्थापनाने चौकशी केली. ग्राहकांशी संपर्क साधला. त्यांची समजूत घातली. यानंतरही ग्राहकांनी पैशाची परतफेड केली नाही. बँकेचे कर्मचारी वारंवार तगादा लावत असताना गुरव बंधूने सारा प्रकार बँक व्यवस्थापनाला सांगितला आणि या बनावट प्रकरणाचा भंडाफोड झाला. या प्रकारामुळे बंँकेतील अधिकारी आश्चर्यचकित झाले असून असा प्रकार आणखी काही बँकांमध्ये झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोपीची चौकशी
दरम्यान बँक व्यवस्थापनाने वर्षभरापूर्वीच अनिलला नोटीस बजावली. कार्यालयाने त्याची चौकशी सुरू केली. अहवाल आल्यानंतर बँक व्यवस्थापक सगम यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी नंतर अनिल विरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपीला नोटिस देऊन त्याची चौकशी करण्यात येईल, असे पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी सांगितले.