नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात टोईंग व्हॅनमधील युवकांना आवरण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. वाहतूक पोलिसांच्या संरक्षणात काम करणाऱ्या टोईंग व्हॅनमधील युवकांनी एका दुचाकीस्वार युवकाला जबर मारहाण केली. युवकाला अश्लील शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार होत असताना वाहतूक पोलीस मात्र कोणतीही मध्यस्थी करताना दिसत नव्हते. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नंगा पुतळा चौकात घडली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. गेल्या काही महिन्यांपासून टोईंग व्हॅनवरील युवकांची गुंडागिरी वाढली असून विशेष करून तरुणी-महिलांशी आरेरावी करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील नो पार्कींगमधील वाहने उचण्याचे कंत्राट विदर्भ डेकोफर्न या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीची जवळपास १० पेक्षा जास्त वाहने शहरातील वाहने उचण्याचे काम करतात. त्यांच्या वाहनांवर काही युवक मजूर म्हणून काम करतात. डेकोफर्न कंपनीच्या प्रत्येक वाहनावर एक वाहतूक पोलीस तैनात असतो. त्यामुळे टोईंग व्हॅनवरील मजूर युवक नेहमी अरेरावी करीत असतात. वाहनचालक वाहनाजवळ हजर असल्यानंतरही वाद घालून वाहन बळजबरीने टोईंग व्हॅनमध्ये वाहन कोंबतात. या वाहनांवरील युवक नेहमी अश्लील शब्दाचा वापर करतात. आता तर वाहनचालकांना मारहाण करण्यापर्यंत मजल या युवकांची गेली आहे.

हेही वाचा : बुलढाणा : खामगाव – जालना रेल्वेमार्गावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

वाहतूक पोलीसाची बघ्याची भूमिका

अशाच प्रकाची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नंगा पुतळा चौकात घडली आहे. कॉटन मार्केट वाहतूक परिमंडळात कार्यरत डेकोफर्न कंपनीच्या टोईंग व्हॅनवरील युवकांनी एका दुचाकीस्वार युवकाला बेदम मारहाण केली. तो युवक दुचाकीजवळ उभा असताना त्याची दुचाकी उचलण्यात आली. त्यामुळे हा सर्व प्रकार घडली. कंपनीच्या चार मजुरांनी दुचाकीस्वाराला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेचे चित्रिकरण करणाऱ्या एका युवकाचा भ्रमणध्वनी हिसकावून शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार सुरु असताना वाहतूक पोलीस कर्मचारी मध्यस्थी न करता कंपनीच्या मजुराची बाजू घेत होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा : “कुलगुरूंच्या कक्षातील कपाटाचे कुलूप तोडा, अनेक अहवाल उघड होतील!”, विद्यापीठाच्या अधिसभेत खडाजंगी

गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

शिवसेनेच्या (उबाठा) गटाचे नितीन तिवारी यांनी या प्रकरणी कंपनीच्या मजुरावर गुन्हा दाखल करून नोकरीवरून काढण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी रामचरण यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात तिवारी यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच पोलीस आयुक्तांना भेटून न्यायाची मागणी करण्यात येणार आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या प्रकरणी तक्रार आली असून त्या युवकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार संदीप बुवा यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur biker beaten up by youths working on traffic police s towing van video viral adk 83 css