नागपूर : उद्धव ठाकरे यांना आमदार, खासदार सोडून गेले तेव्हाच त्यांचे पक्षातील नेतेपद संपले होते. अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य असून उच्च न्यायालयात जाण्यापासून त्यांना कोणीही रोखले नाही, त्यांनी उच्च न्यायालयात जावे मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल, असे भाकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवले आहे. चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल पारदर्शक पद्धतीने दिला आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना एकूण मतदान किती आहे याचा विचार करण्यात आला. मतदानाच्या आधारावर पक्षाची नोंद होत असते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर तुमच्या सोबत नसेल तर आपोआपच पक्षाचे नेतेपद जाते. सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि मते शिंदे गटाकडे आहे त्यामुळे तेच नेते असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. नियम सर्वांना सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेगळा नियम उद्धव ठाकरे यांना वेगळा नियम, असे होणार नाही.
हेही वाचा : “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा”, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची मागणी
…त्यांच्यासाठी आमचे दुपट्टे तयार
निकाल हा निकाल असतो. मेरीटच्या आधारावर तो निकाल दिलेला आहे. जे मेरिट निवडणूक आयोगाने दिले आहे त्याच आधारावर निकाल लागला आहे. या निकालाचा पुढील राजकारणाशी काहीही संबंध नाही. विविध पक्षातील नेते यापूर्वीच एकनाथ शिंदे गटाकडे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास उत्सुक आहे. जे लोक आमच्याकडे येतील त्यांच्यासाठी आमचे दुपट्टे तयार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; कारण काय? जाणून घ्या…
काँग्रेसकडून रामभक्त आणि देशाचा अपमान
जगातील सर्वात मोठा दिवाळी उत्सव अयोध्यासह देशभरात साजरा होत आहे. जगातील सर्वात सुंदर मंदिरात प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अशावेळी काँग्रेस पार्टीने निमंत्रण नाकारणे म्हणजे एक प्रकारे रामभक्तांचा आणि देशाचा अपमान आहे. काँग्रेस पार्टी ही नियमित राम मंदिराच्या विरोधात राहिलेली, आहे असेही बावनकुळे म्हणाले.