नागपूर : “आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा स्वत:ला नेता बनविणारी यात्रा आहे”, अशी टीका भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य राम शिंदे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली ही यात्रा रविवारी उपराजधानीत दाखल झाली. येथे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
“रोहित पवार यांचे काका उपमुख्यमंत्री अजित पवार सांगताहेत की रोहित पवार यांनी जीवनात कधीही संघर्ष केला नाही. विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी या यात्रेला बालमित्र मंडळाची यात्रा संबोधले आहे. वास्तविक पाहता, जे जीवनात संघर्ष करतात तेच आपले अनुभव मांडतात आणि लोकांपुढे आदर्श ठरतात. पण, रोहित पवार यांनी जी संघर्षयात्रा काढली त्यात डीजेपुढे डान्स केला, स्वत:वर फुले उधळूण घेतली. कापूस वेचण्याचा नौटंकीपणा केला. विहिरीत सैराट उड्या मारल्या. अशा प्रकारे एकमेकांच्या हातात हात घेऊन ही संघर्षयात्रा सुरू आहे,” असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा : कांदा निर्यातबंदीवरून विरोधकांकडून राज्य सरकारची कोंडी! कांद्यांची माळ घेऊन…
आऊटसोर्सिंगच्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या काळात जो शासन निर्णय काढण्यात आला होता, तो विद्यमान सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा फुसका बार ठरली आहे. स्वत:चे घरपरिवार सोबत घेऊन निघालेली ही संघर्ष यात्रा आहे, स्वत:च्या गुडघ्याला बाशिंग बांधून नेता बनण्याचा हा प्रयत्न आहे, असेही शिंदे म्हणाले.