नागपूर : अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले आहेत परंतु ते आज माझ्या विरोधात प्रचार करत आहे. एक तर जे तुरुंगात जाण्याच्या स्थितीत होते आणि त्यांना अटक होण्यापासून मी वाचवले होते. ते सुद्धा आज विरोधात प्रचार करत आहे. मात्र, याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
नागपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत वचननामा ते वचनपूर्ती हा जाहीरनामा जाहीर केला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात नागपूर शहरात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षात शहराच्या विकासासाठी कुठली विकास कामे केली जाणार आहे याचा आलेख मांडताना गडकरी म्हणाले, गेल्या पंधरा वीस दिवसांपासून शहरातील विविध भागात प्रचार सुरू असताना लोकांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, माझ्यासोबत काम करणारे किंवा ज्यांना मी अनेक कामात मदत केली आहे असे अनेक काँग्रेसचे कायकर्ते व नेते माझ्या विरोधात प्रचार करत आहे.
हेही वाचा : यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
शहरात दोन तीन दिवसापूर्वी एक पदाधिकारी विरोधात फिरत होते, जे तुरुंगात जाण्याच्या स्थितीत होते. त्यांना अटक होण्यापासून मी वाचवले आहे. मात्र, ते आज विरोधात प्रचार करत आहे. त्याला माझा काही आक्षेप नसून मी विरोधात असलेल्यांची काम केली आहे. मी कधीही जातीभेद किंवा पक्ष क्षेद केला नाही. जो माझ्याकडे आला आहे त्याचे काम केले, असेही गडकरी म्हणाले.