नागपूर : राहुल गांधी यांची सध्या अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जावो, अशी झाली आहे. ममता म्हणतात काँग्रेस के साथ नही, पंजाबचे मान म्हणतात मी इंडिया आघाडीत नाही, बिहारचे नितीश कुमार मोदी असेल तरच विकास होईल म्हणून आमच्या सोबत आले आहे. त्यामुळे कदाचित काँग्रेससाठी ही लोकसभा निवडणूक शेवटची निवडणूक असल्याची टीका राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सुधीर मुनगंटीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : छगन भुजबळ यांना धर्मरावबाबांचे बळ! म्हणाले, “त्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची”
राज ठाकरे पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने राज्यात बैठका घेत असतील तर प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी मोर्चे बांधणी केली पाहिजे. मात्र, देशाच्या विकासात मोदी यांचे योगदान असल्यामुळे त्यांच्याशिवाय कोणी नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. संजय राऊत यांना आता वाटत असेल तर मनसेला ऑफर देतील. महाविकास आघाडीला आता मदतीची आवश्यकता आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत करण्याचा प्रश्नच नाही. एखाद्या व्यक्तीने जर तुलना केली तर ती मोदींनी केली असे होत नाही. राज्यात शरद पवारांना जाणता राजा म्हटले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रति शिवाजी म्हटले जात होते. त्यामुळे कुठल्या थोर पुरुषांसोबत तुलना करणे योग्य नाही, असेही मुगंटीवार म्हणाले.