अमरावती : बडनेरा मतदारसंघात महायुतीतर्फे आपल्‍यालाच उमेदवारी मिळणार असल्‍याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला असला, तरी भाजपचे इच्‍छूक उमेदवार तुषार भारतीय यांनी त्‍यांच्‍या मतदारसंघात तंबू ठोकून राणांना आव्‍हान दिले आहे.

दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोप सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍या उमेदवाराच्‍या विरोधात भूमिका घेतल्‍याने तुषार भारतीय आणि त्‍यांचे बंधू विधानपरिषद सदस्‍य श्रीकांत भारतीय यांना भाजपमधून निलंबित करावे, अशी मागणी रवी राणांनी केली आहे. दुसरीकडे, रवी राणा यांना भाजपविषयी बोलण्‍याचा अधिकार नाही. राणा महायुतीत कधीच नव्‍हते, ते सोयीचे राजकारण करतात, अशी टीका तुषार भारतीय यांनी केली आहे.

हे ही वाचा…यवतमाळ : नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना मदत, पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी बडनेरा येथे जनसंपर्क कार्यालय थाटल्‍याने राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षातील कार्यकर्त्‍यांची अस्‍वस्‍थता वाढली आहे. भारतीय यांनी निवडणूक जाहीर होण्‍याआधीपासून प्रचार सुरू केला आहे. ‘२० तारखेपासून होईल इतिहासातील नव्‍या पर्वाची सुरूवात’ असा नारा देत भाजपची उमेदवारी आपल्‍यालाच मिळेल, असा दावा तुषार भारतीय यांनी केला आहे. भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांना पराभूत करण्‍याचे काम ज्‍यांनी केले, ज्‍यांनी भाजपसोबत बंडखोरी केली. काही नेत्‍यांकडून सुपारी घेऊन भाजपच्‍या सोबत राहून भाजपचा घात करतात, असे काही कटप्‍पा लोक आहेत. ज्‍या लोकांनी महायुतीच्‍या विरोधात भूमिका घेतली, अशा नेत्‍यांवर भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अशाच पद्धतीने तुषार भारतीय आणि श्रीकांत भारतीय यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी आपण करीत असल्‍याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

हे ही वाचा…आनंदवार्ता! ‘या’मार्गावर नवीन रेल्वे धावणार; मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना…

त्‍यावर तुषार भारतीय यांनी जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले आहे. भाजपसोबत रवी राणा यांचा काय संबंध आहे, असा सवाल त्‍यांनी केला. राणांनी स्‍वत:च्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाकडे बघावे. त्‍यांच्‍या पक्षात किती गुन्‍हेगार लोक आहेत, याकडे त्‍यांनी लक्ष द्यावे. भाजपमधून आम्‍हाला निलंबित करायचे, नाही करायचे, हे भाजपचे पक्षश्रेष्‍ठी ठरवतील. भाजपसोबत राणांचा काहीच संबंध नाही, उलट भाजपला अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा धक्‍का रवी राणांमुळेच सहन करावा लागला. सतत नेत्‍यांना शिवीगाळ करण्‍याचे काम केले. राणांनी स्‍वत: याची कबुली दिली आहे. राणांना केवळ प्रसिद्धी हवी आहे. त्‍यांना यावेळी आपला पराभव दिसत आहे, अशी टीका तुषार भारतीय यांनी केली. रवी राणांना भाजपविषयी प्रेम केव्‍हापासून आले, असा सवाल त्‍यांनी केला.

Story img Loader