नागपूर : उपराजधानीत रेडी रेकनरचे दर न वाढल्याने घर खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. फ्लॅट, जमिनीचे दर स्थिर राहण्याचे संकेत असल्याने त्यांची विक्री वाढून या क्षेत्राला बळ मिळण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहेत.
नागपूर हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. येथील चारही दिशेला मेट्रोचे जाळे पसरले असून पुढेही विस्तार होत आहे. औद्याोगिक विस्तारही होत असून बेसा, बेलतरोडी, दाभा, जयताळासह इतरही भागात बांधकाम व्यवसायिकांनी हजारो कोटींच्या निवासी व इतर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! राज्यात २४.४० टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखाली, नीती आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह
करोना काळात नागपुरात जमीन, फ्लॅटची मागणी घसरल्याने या क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. परंतु, करोनानंतर स्थिती पूर्वपदावर आली आहे. आता रेडी रेकनरचे दर वाढले नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होण्याची शक्यता आहे.
महामार्गालगतच्या गुंतवणुकीला लाभ
मिहान परिसर, हिंगणा रोड, समृद्धी महामार्गाला लागून असलेला भाग, वर्धा रोड, अमरावती रोड, उमरेड रोड, काटोल रोड, छिंदवाडा रोडसह इतरही भागात सध्या बांधकाम व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यापैकी बऱ्याच भागात निवासी संकुलासह इतर काही प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवल्याने या प्रकल्पांनाही गती मिळण्याची आशा आहे.
हेही वाचा : नवनीत राणांच्या प्रचार फलकांवरील संजय खोडकेंचे छायाचित्र हटविले
जमिनीचे दर असे…
अनंत नगर परिसरात ३,३०० ते ३,६५० रुपये प्रति चौरस फुट, वाठोडयात ३,२५० ते ४२५० रुपये, चिंचभवनमध्ये ३,७०० ते ४,२५० रुपये, लक्ष्मीनगरमध्ये ६,६०० ते ८,०५० रुपये, फ्रेन्ड्स कॉलनीत ४,२५० ते ५,००० रुपये, सिव्हिल लाईन्समध्ये ६,८०० ते ९,१५० रुपये, कोराडी रोडवर ३,३५० ते ३,८५० रुपये, उमरेड रोडवर ३,२५० ते ४,१५० रुपये, रिंगरोड ३,३५० ते ४,२५० रुपये प्रति चौरस फूट इतके सरासरी जमिनीचे दर आहेत. रेडी रेकनर दराच्या आधारावर येथील मुद्रांक व इतर शुल्क निश्चित केले जाते.
हेही वाचा : काँग्रेसकडून अकोल्यात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी; तिरंगी लढत होणार
नागपुरात सलग दुसऱ्या वर्षी रेडी रेकनरचे दर वाढले नाहीत. पुढच्या वर्षी ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा गुंतवणूकदारांना संपत्ती खरेदीची चांगली संधी आहे.
महेंद्र जिचकार, संचालक, अंजनीकृपा प्रोजेक्ट प्रा. लिमी.
रेडी रेकनर दर स्थिर राहिल्याने शहरात मालमत्ता करासह इतरही काही करात वाढ होणार नाही. त्याचा नागरिकांना लाभच होईल.
गौरव अग्रवाल, अध्यक्ष, क्रेडाई, नागपूर</strong>