नागपूर : प्रेयसीला पार्टी देणे, तिला महागडे कपडे खरेदी करणे, मेकअपचे सामान खरेदी करणे, तिचा वाढदिवस साजरा करणे आणि तिला पार्टीला नेण्यासाठी प्रियकर कुख्यात घरफोड्या बनला. त्याने चक्क १८ ठिकाणी घरफोडी केली. घरफोडीतून जमवलेले पैसे प्रेयसीवर उडवले. त्यानंतर मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला. आठ दिवसांअगोदर सूर्यनगर येथील एका व्यापाऱ्याकडे साडेचोवीस लाखांची घरफोडी झाल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात घरफोड्या नरेश महिलांगे याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत काही काळापासून केलेल्या १८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी तब्बल साडेतीनशे सीटीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करून त्याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अनिल रामचंद्र ओचल (५२, सूर्यनगर) हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नातेवाइकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबीयांसोबत गेले होते. उमरेड मार्ग येथे हा कार्यक्रम होता. घरी येईपर्यंत त्यांना मध्यरात्री एक वाजला. यादरम्यान, अज्ञात आरोपीने घराच्या तळमजल्यावरील स्लायडिंग खिडकीची काच सरकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुसऱ्या माळ्यावरील बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडले व सोने, हिरे, प्लॅटिनमचे २४.५३ लाखांचा दागिने लंपास केले. घरी परत आल्यावर ओचल यांना हा प्रकार समजला. त्यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ओचल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यात कुख्यात घरफोड्या नरेश महिलांगे याचा सहभाग असल्याची बाब समोर आली. ओचल यांचे कुटुंबीय परत आले तेव्हा महिलांगे आतच होता. तो पळत असताना ओचल यांच्या घरातील पाळीव कुत्रा त्याच्यावर भुंकलादेखील होता. महिलांगे ओचल कुटुंबीयांच्या गच्चीवरून बाजूच्या घरात शिरला व तेथून फरार झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. महिलांगे रात्री कुठे असतो याचा यामाध्यमातून शोध घेण्यात आला. नागपूर शहराच्या सीमेला लागून असलेल्या खेडी गावातील सिमेंटच्या पाईपमध्ये बसून महिलांगे नशा करत असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. त्याला कळमना पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, नितीन चुलपार, राजेश देशमुख, प्रशांत गभणे, प्रवीण रोडे, रवी अहीर, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार, आशीष वानखेडे, पंकड हेडाऊ, मनोज टेकाम, प्रीतम यादव, स्वप्निल खोडके, हंसराज ठाकूर, झिंगरे, पराग ढोक, अनंता क्षीरसागर, धीरज पंचपाभावे, शेखर राघोते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
१८ गुन्ह्यांची उकल
महिलांगे याने मागील काही कालावधीत नंदनवन, लकडगंज, गणेशपेठ, कोतवाली, वाठोडा, कोराडी, यशोधरानगर, मौदा, खापरखेडा, मध्यप्रदेशातील लोधीखेडा येथे घरफोडी तसेच वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याला दारु आणि गांजाचे व्यसन आहे. त्याचे एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरु असून तो तिच्यावर पैसे उडवतो. त्याने बराचसा मुद्देमाल त्याच्या सहकाऱ्यांकडे दिला आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कारसह ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महिलांगे हा कुख्यात दरोडेखोर आहे. त्याने शेकडो गुन्हे केले आहेत. पोलिसांकडून चौकशी टाळण्यासाठी त्याने काही काळापूर्वी ‘लॉक-अप’मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता.