नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात घरफोड्या वाढल्या आहेत. दररोज लाखों रुपयांच्या ऐवजावर चोरटे हात साफ करीत आहेत. पोलिसांच्या गस्त प्रणालीवर संशय निर्माण झाला असून गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकांचे अपयश समोर आले आहे. गेल्या १० दिवसांत शहरात २७ घरफोड्यांची नोंद पोलिसांनी घेतली. त्यावरून दरदिवशी दोन ते तीन घरफोड्या झाल्या आहेत.
शहरात गुन्हे शाखेचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. तसेच घरफोडी विरोधी पथकातही वसुलीबहाद्दरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी कर्मचारी थेट जुगार अड्डे, अवैध दारू विक्री, वरली-मटका संचालक आणि अवैध व्यावसायिकांकडे फेऱ्या मारतात. गेल्या काही दिवसांपासन चोरट्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करण्यास प्राधान्य दिले होते. मात्र, आता चोरट्यांनी सोनेगाव नंतर आता हुडकेश्वर आणि जरीपटक्यात घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या असून जवळपास सात लाखांचा मुद्देमाल चोरी गेल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
पहिली घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. न्यू ओम नगर येथील रहिवासी फिर्यादी राजेंद्र कुंभारे (४५) हे कुटुंबियांसह भाउबिज निमित्त साळ्याकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील एक लाख १८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये असा एकूण २ लाख १८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.
हेही वाचा : लोकजागर- गडचिरोलीचा गहिवर (?)
अमरज्योतीनगर, भीम चौक येथील रहिवासी फिर्यादी गजानन चव्हाण (६३) हे कुटुंबियांसह पुण्याला गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने दाराचा कडी कोंडा तोडून कपाटातील २ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख एक लाख ६८ हजार रुपये असा एकूण ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हुडकेश्वर आणि जरीपटका पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.