नागपूर : पाचवी नापास एका भंगार विक्रेता युवकाची लक्षाधीश वाहतूक व्यावसायिकाच्या एकुलत्या एका मुलीशी मैत्री झाली. दोघांच्या भेटी होत गेल्या आणि त्यांचे प्रेम जडले. भंगारविक्रेता प्रियकराला ती कारने भेटायला येत होती. दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण मुलीच्या कुटुंबियांना लागताच दोघांनी पळून जाऊन दिल्लीतील एका खेडेगावात संसार थाटला. वाहतूक व्यावसायिकाने वाठोडा पोलिसांत तक्रार केली. त्यांनी तब्बल दोन महिने मुलीचा शोध घेऊन दोघांनाही दिल्लीतून ताब्यात घेतले. मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिले तर पोलिसांनी भंगारविक्रेत्याला समज देऊन वठणीवर आणले. एखाद्या चित्रपटाला शोभेल ,अशी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोड्यातील श्रीमंत वाहतूकदार असलेल्या व्यक्तीला एकुलती एक मुलगी प्रिया (काल्पनिक नाव) पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तिच्या वस्तीत इरफान (२२, रा. सक्करदरा) हा भंगार घेणारा नेहमी येत होता. अनेकदा त्याने प्रियाच्या घरातील भंगारचे सामान विकत घेतले. त्यामुळे वाहतूकदाराची इरफानशी ओळख होती. अनेकदा तो प्रियाच्या घरासमोर असलेल्या पानठेल्यावर थांबत होता. दरम्यान, प्रियाच्या घरातील भंगार विकत घेण्यासाठी आलेल्या इरफानशी प्रियाने संवाद साधला. त्यानंतर तो वारंवार तिच्या घरासमोर भंगार खरेदी करण्यासाठी येत होता. प्रियाने त्याचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघे एकमेकांशी फोनवर बोलत होते. यादरम्यान त्यांच्या मैत्री झाली. इरफान हा भंगारची गाडी घेऊन प्रियाच्या घरी वारंवार यायला लागला आणि प्रियासुद्धा त्याला प्रतिसाद देत होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रियाने वडिलांकडून काही पैसे घेऊन त्याला कपडे, बुट गिफ्ट दिले. दोघेही वस्तीत भेटण्याऐवजी फुटाळा आणि अंबाझरी तलावावर जाऊन भेटायला लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
प्रेमविवाह करुन संसार थाटण्याचे स्वप्न
प्रिया आणि इरफान यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रियाने काही पैसे घेतले आणि दोन महिन्यांपूर्वी इरफानसोबत पळ काढला. दोघेही रेल्वेने दिल्लीला गेले. काही दिवस कामाच्या शोधात फिरले. पैसे संपल्यानंतर शेटी देवरी नावाच्या गावात दोघांनी एका ऑटो व्यवसायिकाच्या घरी एक रुम किरायाने घेतली. इरफानने भंगार खरेदी-विक्रीचे काम सुरु केले तर प्रिया ही एका झेरॉक्सच्या दुकानावर काम करू लागली. दोघांनी एका छोट्याशी खोलीत संसार सुरु केला.
पोलिसांनी घेतला दोघांचाही शोध
वाठोड्याचे ठाणेदार हरिष बोराडे यांनी मुलीच्या शोधासाठी पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक सचिन ठाकरे, सहायक उपनिरीक्षक नत्थुजी ढोबळे, महिला अंमलदार संगीता तावरे यांना सुगावा लागताच दिल्ली गाठले. तांत्रिक तपासावरुन दिल्ली पोलिसांच्या मदतीने भंगार खरेदी करताना इरफानला ताब्यात घेतले. प्रियाबाबत विचारणा करताच त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरी नेले. पोलिसांनी प्रियालाही ताब्यात घेतले आणि नागपुरात आणले. मुलीला पालकांच्या ताब्यात दिले तर इरफानला समज देण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd