नागपूर : वाघाचा तो बछडा चांगलाच जखमी होता आणि त्याच्यावर उपचाराची नितांत गरज होती. डोक्यावर तळपता सूर्य आणि अशा या तापमानात त्याला “tranquilize” म्हणजेच म्हणजेच बेशुद्ध करून जेरबंद केले असते तर त्याच्या जीवाला आणखी धोका निर्माण झाला असता. त्यामुळे त्याला “फिजिकली रेस्क्यू” म्हणजेच बेशुद्ध न करता जेरबंद करण्याचा निर्णय झाला. ही मोहीम पार पाडताना ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा जीव एकवेळ धोक्यात आला होता, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी ही मोहीम यशस्वी केली.

बुटीबोरी वनपारिक्षेत्रातील शिंदीविहीर क्षेत्रात शेतालागत नाल्यात एक सात ते आठ महिन्याचा वाघाचा बछडा जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांनी सेमीनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमुला माहिती दिली. केंद्राचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर हे “रेस्क्यू ऑपरेशन” सोपे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ४४ अंश सेल्सिअस तापमानात जखमी वाघाच्या बछड्याला बेशुद्ध करून रेस्क्यू केले असते तर त्याच्या जीवाला धोका होता आणि फिजिकली रेस्क्यू करायचे तर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होता. मात्र, बछड्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला व वाघाच्या बछड्याला फिजिकली रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली.

जखमी वाघ जास्त धोकादायक असतो आणि याठिकाणी वाघाच्या बछड्याची आई आणि भाऊ सुद्धा असल्याने बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला डबल धोका होता. प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांच्या नेतृत्वाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले. यादरम्यान बछड्याने बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. यात एक कर्मचारी खाली पडून जखमी झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यामध्ये वाघाला प्रत्यक्ष फिजिकल रेस्क्यू करणारे ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. प्रियल चौरागडे, सिद्धांत मोरे, बंडू मंगर, चेतन बारस्कर, आशिष महल्ले, स्वप्नील भुरे, वनरक्षक हरीश किनकर, प्रतीक घाटे, यांनी महत्वाची भूमिका निभावली.सोबतच बुटीबोरी वनपरिक्षेत्राचे क्षेत्रसहायक श्री लोणकर, केकाण, नांदुरकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत हजर होते.