नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तेलंगणात पळून जाण्यास मदत करणाऱ्या प्रशिक पडवेकर याच्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे आणि भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात तक्रार देण्यात आली. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवद्रोही प्रशांत कोरटकर याची चंद्रपुरातील आलिशान हॉटेलात मुक्कामाची व्यवस्था करण्यापासून तर तेलंगणा राज्यात पळूण जाण्यात मदत करण्यापर्यंत भाजपच्या एका बड्या नेत्याच्या नागपूर कार्यालयात काम करणारा भाजप कार्यकर्ता प्रशिक पडवेकर आघाडीवर होता. कोरटकर याला तेलंगणात पळवून नेण्यात भाजप सहभागी आहे असा आरोप कॉग्रेसते प्रवक्ते अतूल लोंढे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री खरेच शिवप्रेमी असाल तर खरी माहती लोकांना द्यावी, आमची माहिती अशी आहे की, प्रशिक पडवेकर हे कधीकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करीत होते. कोरटकर यांना अटक झाली तेव्हा पडवेकर यांच्या सोबत होते. कोल्हापूर पोलीसांनी त्यांनाही ताब्यात घेवून सोबत घेऊन गेले. कोरटकर यांना खरी मदत कोणी केली, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे हे गृहमंत्र्यांनी सांगावे असेही लोंढे यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे भाजपचे शहरअध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह शेकडो भाजपचे कार्यकर्ते गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर होते. त्यांनी अतुल लोंढे मुर्दाबादचे नारे लावले.
मुख्यमंत्र्यांची विनाकारण बदनामी करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे, शांतता भंग होईल असे वातारण निर्माण करणे, या कलमाखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे बंटी कुकडे यांनी केली होती. त्यावरुन गणेशपेठ पोलिसांनी कॉंग्रेसचे प्रवक्ते अतूल लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात प्रतिक्रिया घेण्यासाठी गणेशपेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छींद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.