नागपूर : अपघात विम्याचे पैसे उकळण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षकाने तिघांना हाताशी धरुन अपघाताचा बनाव रचला. तोतया साक्षिदार आणि तक्रारदाराचा जबाब घेऊन न्यायालयात आरोपपत्र पाठवले. मात्र, त्यांची योजना फसली आणि पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजकुमार पन्नालाल उपाध्याय असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. नुकताच बजाजनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा धुळीस मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवमौली जयवंत दोरनारवार हे नागपूर नागरिक सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ३१ डिसेंबर २०१६ रोजी ते पायी बँकेत जात होते. दरम्यान, त्यांना एका वाहनाने धडक दिली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक काँक्रीटवार यांनी गुन्हा दाखल केला होता. तर तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार उपाध्याय हे या अपघात प्रकरणाचे तपास अधिकारी होते. त्यांनी विमा कंपनीचे पैसे उकळण्यासाठी कट रचला. न्यायालयातील लिपिक विजय सहदेव गायकवाड, श्रीकृष्ण अजाबराव थोरात आणि अभिजीत विनोद दुरुतकर यांना कटात सहभागी केले. विमा कंपनीकडून मिळणारी रक्कम समसमान वाटून घेण्याचे चौघांमध्ये ठरले. त्यासाठी त्यांनी बनावट वाहन, तोतया आरोपी आणि बनावट साक्षीदार तयार केला. पोलीस कर्मचारी राजकुमार उपाध्याय यांनी बनावट कथानक रचून अपघाताचे आरोपपत्र तयार केले. साक्षीदार प्रितम लाभसेटवार यांचा जबाब घेतला. मात्र, प्रत्यक्षात प्रीतम यांना या अपघाताबाबत काहीही कल्पनासुद्धा नव्हती. परंतु, त्यांचे कागदपत्र न्यायलयात वापरले. आरोपपत्र पाठविल्यानंतर अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना पैसे मिळविण्यासाठी कट रचला.

हेही वाचा : वर्धा: हिट अँड रन प्रकरणात एकास अटक, एक अल्पवयीन फरार

सीआयडीने उघडकीस आणला गुन्हा

सीआयडीच्या पोलीस निरीक्षक विजया अलोणे (अकोला) यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. त्यांनी या प्रकरणातील साक्षिदार, पंच आणि घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार उपाध्याय याने बनावट अपघाताचे चित्रण केल्याचे लक्षात आले. त्यामुळे गुरुवारी लकडगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : नागपूर : खंडणीखोर पोलीस कर्मचारी निलंबित

उपाध्याय यांची वादग्रस्त कारकिर्द

सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार उपाध्याय यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी गिट्टीखदानमध्ये कार्यरत असताना एका प्रेमी युगुलाला पकडले होते. त्यांनी प्रियकराकडून पैसे घेऊन त्याला दमदाटी केली होती. तर आईवडिलांना प्रकरण सांगण्याची धमकी देऊन तरुणीकडूनही पैसे उकळल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur case against police sub inspector who planned to get insurance claim of accident deceased adk 83 css