नागपूर : महापालिका मुख्यालयात कुंड्याची तोडफोड करुन नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने सहायक आयुक्त श्याम कापसे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महापालिकेच्या तक्रारीवरुन वसीम लाला (३२ वर्षे, रा. मोमोनपुरा, नागपूर), प्रमोद ठाकुर, (२५ वर्षे रा. पेंशन नगर, पोलिस लाईन टाकळी, नागपूर), ओम तिवस्कर, ( ३२ वर्षे, रा. पेंशन नगर, पोलिस लाईन टाकळी) समीर रॉय, (३५ वर्षे, रा. गिट्टीखदान, काटोल रोड), मिलींद दुपारे, ( ३५ वर्षे, रा. रघुजीनगर) लंकेश उके, (४० वर्षे, रा. उत्तर नागपूर) या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३२४ (३), १८९(२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ च्या १३५ या कलमान्वये गुन्हा सदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे शहरातील विविध समस्या व महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचा ठपका ठेवत संतप्त आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनानंतर आमदार विकास ठाकरे व काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. सर्व कार्यकर्ते निघून जातेवेळी वसीम लाला, प्रमोद ठाकुर, ओम तिवस्कर, समीर रॉय, मिलींद दुपारे, लंकेश उके यांनी महापालिका मुख्यालय इमारतीच्या मुख्य द्वारापुढे प्रथम मटके फोडले व नंतर मुख्यालयाच्या दालनाच्या मुख्य दारात असलेल्या कुंड्यांची नासधूस केली, अशी तक्रार महापालिकेने पोलिसात केली.

रस्ते, रस्त्यावरील खड्डे, पिण्याचे पाणी, अस्वच्छता तसेच घर कर आणि पाण्याचे देयक यासंदर्भातील अनेक समस्या आहेत. त्या सोवडण्यात महापालिका प्रशासनाला अपशय आले आहे. त्याविरोधात शहर काँग्रेसने मंगळवारी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने केली व कार्यालयातील कुंड्या फोडून निषेध नोंदवला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन महापालिका मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या.

महापालिकेत सुमारे चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाही. येथे प्रशासक राज आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांची विविध कामे करवून घेण्यात अडचणी निर्माण होत आहे. प्रशासकाकडून नागरिकांना योग्य दिलासा देण्यात विलंब होत आहे. तसेच चोवीस तास पाणीपुरवठा योजना नागपुरात सुरू असताना अनेक भागात अद्यापही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागताच काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये मलनिस्सारण वाहिनी फुटल्या आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.