नागपूर : खापा वनपरिक्षेत्राअंतर्गत नागलवाडी वनक्षेत्राअंतर्गत कोरमेटा नियतक्षत्रातील मोजा सिरोंजी हद्दीत भनगाळा नाल्यामध्ये १४ मार्चला वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाचे पायाचे चार पंजे, मिश्या व चार सुळे दात शिकाऱ्यानी काढून नेल्याचे आढळून आले. घटनास्थळी पाहणी केली असता ११ के.व्ही. विदयुत लाईनवर आकोडा टाकुन, विदयुत प्रवाहाव्दारे आरोपींनी वाघाची शिकार केली असल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याने अज्ञात आरोपी विरूध्द वनगुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्याकरिता नागलवाडी वर्तुळ मधील सोनपुर, सिरोंजी, सुरेवाणी, टेकाडी, कोरमेटा, बिचवा इत्यांदी गावात वनविभागाने गस्ती वाढवली. नागलवाडी वनक्षेत्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशमधील वन्यजीव शिकार संवेदनशिल गावे सारदोनी, सवरणी, चकारा, चोरे पठार, तोरणी इत्यांदी गावामध्ये गस्त वाढवण्यात आली. त्यामुळे प्रकरणातील आरोपीचा शोध घेता आला.

या प्रकरणात महाराष्ट्रातील स्थानिक चार आरोपी व मध्यप्रदेश मधील तोरणी ता. बिछया नि. छिदवाडा या गावातील दोन आरोपीचा सहभाग दिसून आल्याने आरोपीना अटक करण्यात आली. आरोपींनी वन्यप्राणी शिकार केल्याबाबत माहिती दिली असुन शिकार करण्याचे साहित्य अवजारे इत्यांदी आरोपीकडून हस्तगत करण्यात आले.

याप्रकरणात २० मार्चपर्यंत प्रथम श्रेणी न्यायालय, सावनेर यांनी चार आरोपीना बनकोठडी मंजुर केली होती. दरम्यान प्रकरणामध्ये दोन मध्यप्रदेश मधील आरोपींना अटक करण्यात आली. या सहाही आरोपीना न्यायालयात हजर केले असता. त्यांना २४ मार्चपर्यंत वनकोठडी मंजूर करण्यात आली आहे.

सदर वनगुन्हा प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष यांची तपासाकरीता मदत घेण्यात आली. व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे श्वान पथकाची मदत घेण्यात आली. तथापी पुढील तपास चालू असून प्रकरणातील इतर फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

सदर प्रकरणी वनगुन्हयाचा पुढील तपास डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक नागपुर वनविभाग, नागपुर यांच्या मार्गदर्शनात व्ही. सी. गंगावणे, सहाय्यक वनसंरक्षक, नागपूर वनविभाग नागपूर तपास अधिकारी व एस. जी. आठवले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक तपास अधिकारी खापा हे करत आहे.

खापा वनपरिक्षेत्र सावनेर तालुक्यात वन्यप्राणी शिकार व अवैध वृक्षतोड संबंधीत वनगुन्हेची तसेच आरोपीची माहिती मिळाल्यास सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्याचे आव्हान नागपूर प्रादेशिक वनखात्याने केले आहे.

Story img Loader