नागपूर : आज भाजपला मोठे यश मिळाले. याचे श्रेय सुमतीताईंना जाते. हे यश सहज मिळालेले नाही. हजार किलो वजनाचा ट्रक चालत असताना त्याच्या खाली असलेल्या श्वानाला आपणच ट्रक चालवतो असे वाटते. परंतु, असे मुळीच नाही. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावे. आपल्याला मिळालेले यश आपले नसून ते सुमतीताईंसारख्या अनेकांच्या त्यागामुळे मिळाले आहे, असे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, बालजगतच्या संस्थापिका सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी समारोप सोहळ्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार प्रा. अनिल सोले आदींची उपस्थिती होती. संघर्षाचा काळ आपल्या जीवनाची प्रेरणा बनतो. आज आम्ही कुणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकतो. परंतु, सुमतीताईंना निवडून आणू शकलो नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा : राज्यात मुंबईनंतर उपराजधानीत देहव्यापार वाढला, मसाज-स्पामध्ये सर्वाधिक देहव्यापार
युद्धभूमी सोडली नाही
पक्ष, संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. पक्षाला मान-सन्मान नव्हता. मान्यता नव्हती. पक्षाचे काम जवळपास संपुष्टात आले होते. पण राष्ट्राच्या पुनर्निमाणाचा विचार सुमतीताईंनी संघर्षातून पुढे नेला. ताईंचे संघर्षमय जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे, या शब्दांत गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई प्रत्येकवेळी निवडणूक हरायच्या आणि पुन्हा जिद्दीने कामाला लागायच्या. माझ्या आईला वाईट वाटायचे. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढू नका, असे ती सुमतीताईंना म्हणाली. पण ताई लढत राहिल्या. संघर्ष करत राहिल्या. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक वाक्य आहे : ‘मॅन इज नॉट फिनिश्ड व्हेन ही इज डिफिटेड; बट ही इज फिनिश्ड, व्हेन ही क्विट्स’. ‘युद्धभूमीवर हरल्यामुळे कुणीही समाप्त होत नाही, पण युद्ध हरल्यानंतर युद्धभूमी सोडणारा समाप्त होतो.’ ताईंच्या जिद्दीमागे असाच विचार होता, असेही गडकरी म्हणाले. भारतीय जनसंघाला जेव्हा प्रचंड विरोध होता अशा काळात सुमतीताई सुकळीकर यांनी पक्ष उभारणीचे काम केले. लोक आमच्या पक्षाला शिव्या घालत असताना त्या जनसंघाचा दिवा घेऊन लोकांमध्ये जात होत्या. सुमतीताई आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेक महिलांनी खऱ्या अर्थाने पक्ष उभा केला. त्यामुळे मातृशक्ती ही आमच्या पक्षाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हेही वाचा : गडकरी करणार फडणवीसांचा सत्कार, काय आहे कारण ?
यावेळी फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा मागोवा घेताना सुमतीताईंचे नाव हे दीपस्तंभासारखे घेता येईल. ज्या काळात आमचा उमेदवार निवडून येण्याची काही शक्यता नव्हती अशा काळात त्यांनी निवडणूक लढवली. चारदा निवडणूक हरल्यावरही तेवढ्याच ताकदीने त्या उभ्या राहिल्या. विरोधकांनाही त्यांनी आपलेसे केले होते. कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ताईंविषयी आदर होता. लोकमाता म्हणून सुमतीताईंनी समाज आणि पक्षासाठी काम केले, असेही फडणवीस म्हणाले.